रत्नागिरीत २२ जानेवारीपासून तीन दिवसांचा “स्वरभास्कर संगीत महोत्सव”

रत्नागिरी : येथील आर्ट सर्कलतर्फे पंधरावा संगीत महोत्सव यावर्षी २२ ते २४ जानेवारी २०२२ या कालावधीत थिबा पॅलेसच्या प्रांगणामध्ये भरणार आहे. यावर्षी पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा महोत्सव “स्वरभास्कर संगीत महोत्सव” म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

रत्नागिरीच्या सांस्कृतिक कलाक्षेत्रात महत्त्वाचे स्थान असणार्‍या या महोत्सवामध्ये पंडित आनंद भाटे, पंडित राम देशपांडे, बासरीवादक प्रवीण गोडखिंडी, व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर, सितारवादक मेहताब अली नियाझी, गायिका दीपिका भागवत, ऋतुजा लाड यांसारखे दिग्गज आणि तरुण कलाकारांचे गायन आणि वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. या कलाकारांसोबत साथसंगतीला अजय जोगळेकर (संवादिनी), यशवंत वैष्णव, मयंक बेडेकर, सिद्धार्थ पडियार (तबला) यांचे वादनही असणार आहे. त्याचसोबत ३० जानेवारी २०२२ रोजी पंडित भीमसेन जोशींना मानवंदना देण्यासाठी शास्त्रीय संगीतामध्ये होणारी स्वरभास्कर बैठक हीदेखील महोत्सवाचाच एक भाग असणार आहे.

गेली चौदा वर्षे अखंड सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे कोकणामधील संगीत रसिकांसाठी एक मेजवानी असते. थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये भरणारा संगीत महोत्सव यावर्षी अधिकच खास असणार आहे, ४ फेब्रुवारी २०२१ ते ३ फेब्रुवारी २०२२ हे पंडित भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असून, २४ जानेवारी रोजी त्यांचा स्मृतिदिन आहे. त्याचेच औचित्य साधून यावर्षीचा पंधरावा संगीत महोत्सव “स्वरभास्कर संगीत महोत्सव” म्हणून साजरा होणार आहे. या दिवशी पंडितजींचे खास शिष्य आनंद भाटे पंडितजींना स्वरांजली वाहतील.

महोत्सवाची सुरुवात २२ जानेवारीला संध्याकाळी सात वाजता दीपिका भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सहगायनाने होईल. त्यांना संवादिनीची साथ हर्षल काटदरे यांची असेल, तर तबला साथ सिद्धार्थ पडियार करतील. त्यानंतर सुप्रसिद्ध बासरीवादक प्रवीण गोडखिंडी आणि त्यांचे पुत्र आणि शिष्य षड्ज गोडखिंडी यांचे बासरीवादन होईल. त्यांना तबलासाथ यशवंत वैष्णव करतील.

महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी २३ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता यज्ञेश रायकर आणि मेहताब अली नियाझी यांची व्हायोलिन-सतार अशी जुगलबंदी सादर होईल. त्यांना तबलासाथ मयंक बेडेकर करतील. यानंतर सुप्रसिद्ध गायक पंडित राम देशपांडे आणि गंधार देशपांडे यांचे गायन सादर होईल. त्यांना संवादिनी साथ अजय जोगळेकर व तबला साथ यशवंत वैष्णव करतील.

महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी २४ जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे अग्रणी गायक आनंद भाटे यांचे गायन होणार आहे. त्यांच्या साथीला तबल्यावर भरत कामत आणि संवादिनी साथीला सुयोग कुंडलकर असतील.

महोत्सवाच्या तिन्ही दिवसांसाठी तिकीटविक्री थिबा राजवाड्याच्या प्रांगणामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. तसेच आर्ट सर्कलतर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी मेम्बरशिप योजना २०२२ सालासाठी सुरू करण्यात आली असून त्यासंदर्भात अधिक माहितीसाठी आर्ट सर्कलशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तीन दिवसांच्या स्वरभास्कर संगीत महोत्सवानंतर ३० जानेवारी रोजी रत्नागिरीत विविध शास्त्रीय संगीत कलाकारांकडून पंडित भीमसेन जोशी यांना मानवंदना म्हणून “स्वरभास्कर संगीत बैठक” आयोजित करण्यात आली आहे. त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply