शिवछत्रपतींच्या दळवटणे छावणीचा इतिहास होणार जिवंत

चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दळवटणे (ता. चिपळूण) येथील शिवछत्रपतींच्या छावणीचा इतिहास जिवंत करण्याचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

रामभाऊ साठे ऊर्फ साठे सर यांच्या तैलचित्र स्वीकार कार्यक्रमात वाचनालयाच्या ता महत्त्वकांक्षी प्रकल्पाबाबतची माहिती लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे अध्वर्यु प्रकाश देशपांडे यांनी दिली. श्री. देशपांडे म्हणाले की, १६० वर्षांपूर्वी काशीकर यांनी चारजणांना घेऊन ग्रंथालय सुरू केले. आज त्याचे रूप भव्य झाले आहे. तरीही भरपूर काम करायचे आहे. सातवाहन काळातील जाते कोकणात मिळाले म्हणजे सातवाहन काळाइतका जुना इतिहास कोकणाला आहे. संग्रहालयात अश्मयुगीन हत्यारे आहेत. डाळीएवढे सोन्याचे नाणे आहेत. लोकमान्यांचे पत्रही होते. ते पुरात वाहून गेले असले तरी सुदैवाने त्याची झेरॉक्स प्रत शिल्लक आहे. कोकणात काय विलक्षण लोक होऊन गेले हे ज्ञात व्हावे म्हणून ही तैलचित्रे उभारत आहोत. खुदीराम बोस यांच्यासारख्यांना बॉम्ब बनवून देणारा कोकणातील गणेश आठल्ये नावाचा क्रांतिकारक पश्चिम बंगालमधील एका जंगलात गेला; मात्र त्याची आठवण आपण ठेवली पाहिजे. वाचनालयासाठी भरीव योगदान असलेले रामभाऊ साठे यांचे तैलचित्रही त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लावण्यात येणार आहे, असेही श्री. देशपांडे म्हणाले.

पुरातन वस्तू कशा मिळतात वा जमवाव्या लागतात याबद्दल देशपांडे यांनी मिश्किल उदाहरण दिले. ते म्हणाले, नव्या भैरीजवळ पुरातन म्हणजे सातवाहनकालीन जाते आहे, ही माहिती कळली होती. ते आणण्यासाठी उचलायला आम्ही गेलो तेव्हा तेथील एक वृद्धा आली. ती म्हणाली, जातं उचलायचं नाही. मला त्यात तुळस लावायची आहे. आम्ही त्यांना म्हटले, तुम्हाला तुळसच हवी आहे मग तुम्हाला पूर्ण नवीन वृंदावन देतो. त्यावर जाते देण्यास त्या तयार झाल्या. संग्रहालयात पुरातन रांजण, समयाही आहेत; मात्र हे सारे जमवणे ही खर्चीक बाब आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे म्हणाले, चिपळूणजवळ दळवटणे येथे छत्रपती शिवरायांचा एक महिना मुक्काम होता. त्यांची एक छावणी होती. राजे असे दीर्घकाळ अपवादानेच कोठे राहिले आहेत. कोकणभूमीला हा मान प्राप्त झाला, ही आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे. शिवरायांबाबत आजही कोकणी माणसाची निष्ठा अशी आहे की, त्या जागेला आजही कोणी कुदळ-फावडे लावत नाही. शिवरायांचे पाय जेथे लागले ती जागा पवित्र, ही त्यामागची भावना आहे. मात्र हा इतिहास आपल्याला किती माहिती आहे तो जपायचा आहे.

श्री. चितळे पुढे म्हणाले, आम्ही संग्रहालय पुन्हा उभारण्याचा संकल्प केला आहे. त्याला साठे सर यांचे नावही देणार आहोत. त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या योगदानामुळे हा इतिहास जागवण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. दळवटणे येथे शिवरायांचा तळ असलेल्या छावणीचा देखावा लेसर शोद्वारे या संग्रहालयात उभा करावयाचा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील वाचन मंदिराने उत्तम संग्रहालय उभारले होते. कोकणाबाबत आपल्यालाच कमी माहिती असते. कोकणचा संपन्न इतिहास, भूगोल आणि कोकणची उत्तुंग माणसे यांची माहिती होण्यासाठी या संस्थेने संग्रहालय उभारले; मात्र २००५ आणि २०२१ ला आलेल्या महापुराने त्याची मोठी हानी झाली; मात्र आम्ही ते आता पुन्हा उभारणार आहोत. पिनकोडचा जन्मदाता माखजनमधील वेलणकर आहेत; परंतु याची आपल्याला माहितीच नसते. ती वाचन मंदिराच्या कलादालनात मिळेल. त्यासाठी येथे कोकणातील भव्य व्यक्तिमत्त्वांचे तैलचित्रांचे दालन उभारले आहे.

वाशिष्ठी नदी तीरावरील दळवटणे येथील याच रेवाचा माळ परिसरात शिवरायांची छावणी होती.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply