खल्वायन, एनसीपीएच्या संयुक्त विद्यमाने संगीत नाट्य महोत्सव
रत्नागिरी : मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट सेंटर (एनसीपीए) आणि रत्नागिरीच्या सांस्कृतिक विश्वात गेली २८ वर्षे सातत्याने संगीत आणि नाट्यक्षेत्रात भरीव योगदान करणाऱ्या खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत जानेवारीत तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव होणार आहे.
रत्नागिरीच्या वातानुकूलित स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ३ ते ५ जानेवारी २०२५ दरम्यान संगीत नाट्य महोत्सव होणार आहे.
एनसीपीए ही भारतातील प्रमुख सांस्कृतिक संस्था आहे. १९६९ मध्ये स्थापन झालेले हे दक्षिण आशियातील पहिले बहुशैली सांस्कृतिक केंद्र आहे. एनसीपीए संस्था संगीत, नृत्य, नाट्य, चित्रपट, साहित्य आणि फोटोग्राफी या क्षेत्रातील भारताच्या समृद्ध कलात्मक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तसेच विविध शैलीतील भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकारांद्वारे आणि नवीन तसेच नावीन्यपूर्ण कार्य सादर करण्यासाठी वचनबद्ध आहे. जेआरडी टाटा आणि प्रसिद्ध अणुभौतिक शास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचे बंधू डॉ. जमशेद भाभा या दोन महान द्रष्ट्यांनी मोठ्या दूरदृष्टीने आणि काळाची गरज ओळखून या संस्थेची स्थापना केली. दरवर्षी ७०० हून अधिक कार्यक्रमांचे आयोजन ही संस्था करीत असल्याने भारतातील हे सर्वांत मोठे आणि सर्वांगीण परफॉर्मिंग आर्ट सेंटर बनले आहे.
खल्वायन संस्थेची स्थापना ऑक्टोबर १९९७ मध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर झाली. शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीताची व संगीत नाटकांची वैभवशाली परंपरा जपण्यासाठी व पुढे नेण्यासाठी गेली २८ वर्षे संस्थेने रत्नागिरीच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान केले आहे. दर महिन्याला होणारी मासिक संगीत सभा (आजपर्यंत ३०५), दरवर्षी दिवाळी पाडवा व गुढीपाडवा या दिवशी होणार्या विशेष संगीत सभा (आजपर्यंत ५०), संगीत प्रशिक्षण शिबिरे, नव्या-जुन्या संगीत नाटकांची यशस्वी निर्मिती (आजपर्यत १५) इत्यादी कार्यक्रमांद्वारे संस्थेचे कार्य सुरू आहे.
या दोन संस्थांतर्फे तीन दिवसांचा संगीत नाट्य महोत्सव होणार आहे. पहिल्या दिवशी, दि. ३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ महोत्सवाचे उद्घाटन होईल. या दिवशी ५९ व्या राज्य नाट्य महोत्सवात १० वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक मिळविणारे संगीत ताजमहाल हे नाटक सादर होईल. मुंबईचे प्रसिद्ध हार्मोनियम वादक, संगीतकार डॉ. विद्याधर ओक यांनी लिहिलेले व संगीत दिलेले हे नाटक एका ऐतिहासिक सत्याच्या पार्श्वभूमीवरील नवे कोरे संगीत नाटक आहे. देखणे नेपथ्य, बहारदार गायकी, भरजरी वेशभूषा, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, भावसंगीत आणि कर्नाटक संगीतातील नवीन रागावर आधारित नव्या चालीच्या मधुर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

शनिवारी, दि. ४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीचे प्रसिध्द कादंबरीकार आणि नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले आणि ६२ व्या राज्य नाट्य महोत्सवात ८ वैयक्तिक पारितोषिकांसह तृतीय क्रमांक मिळविणारे संगीत अमृतवेल नाटक सादर होईल. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून सामाजिक विषमतेच्या गर्तेत सापडलेल्या समाजाला सन्मार्गावर आणण्यासाठी संतांनी आपले आयुष्य वेचले, त्या महान विभूतींमध्ये संत चोखामेळा यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. त्यांच्या जीवनाचा अभ्यास करताना त्यांनी लिहिलेले अभंग, त्यांनी सोसलेल्या यातना आणि विठ्ठलावरची अतूट निष्ठा यातून त्यांचे सामाजिक एकतेसंदर्भातील अमृतवेलीसारखे योगदान, त्यांचे नाट्यमय जीवन चरित्र या नाटकातून मांडले आहे. फिरते नेपथ्य, बहारदार गायकी असलेल्या नव्या चालीच्या सुमधुर नाट्यपदांनी हे नाटक नटलेले आहे.

रविवारी, दि. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता कै. प्रा. वसंत कानेटकर यांचे सुप्रसिद्ध संगीत मत्स्यगंधा नाटक सादर केले जाणार आहे. महाभारतातील कथाभागातील एक पान म्हणजे सत्यवती आणि भीष्म यांच्यातील संघर्ष या नाटकात सादर करण्यात आला आहे. खल्वायनच्या ज्येष्ठ कलावंतांचा कसदार अभिनय, नवीन तरुण तडफदार कलावंतांच्या गायकीतून सादर होणारी देवाघरचे ज्ञात कुणाला, गुंतता र्हदय हे, नको विसरू संकेत मीलनाचा, गर्द सभोती रान साजणी यांसारख्या सुमधुर पदांनी हे नाटक नटलेले आहे.

तिन्ही संगीत नाटकांचे दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे. यामध्ये रत्नागिरी, चिपळूण, देवगड, मुंबई, बीड, पुणे येथील प्रसिद्ध कलावंतांबरोबरच सावनी पाटेकर, सावनी शेवडे, श्रेयस व्यास, लक्ष्मीप्रसाद पटवारी हे प्रसिद्धद तरुण कलावंत भूमिका करणार आहेत. या नाटकांच्या सीझन तिकिटाचे दर ७५०, ५०० आणि २५० रुपये असून ३० डिसेंबरपासून दररोज दिवसभर सीझन तिकिटांची विक्री सुरू होणार आहे. Unbox its my show अॅपवर सीझन तिकिटे उपलब्ध आहेत. दैनंदिन तिकीट दर ३००, २०० आणि १०० रुपये असे असून त्याची विक्री नाट्यगृहावर प्रयोगाचे दिवशी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू असेल.
रत्नागिरी व परिसरातील संगीत नाट्य रसिकांना हा महोत्सव म्हणजे एक पर्वणी आहे. या महोत्सवातील नाटकांचा आस्वाद सर्व संगीत रसिकांनी घ्यावा, असे आवाहन एन.सी.पी.ए. आणि खल्वायन संस्थांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

