रत्नागिरी : ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा’ असं तत्त्वज्ञान आपल्या कवितेतून सांगणारे आणि ‘दिक्कालातुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके’ अशा शब्दांत कवीच्या ताकदीचा प्रत्यय देणारे, आपल्या ‘तुतारी’ने मराठी कवितेत नवे प्राण फुंकणारे ‘नव्या मनूतील नव्या दमाचे शूर शिपाई’ म्हणजे कवी केशवसुत अर्थात कृष्णाजी केशव दामले. कोकणच्या लाल मातीतल्या ज्या गावी ते जन्माला आले, त्या मालगुंडचं नाव त्यांच्या कवितांनी अजरामर केलं. आता साहित्यिक आणि पर्यटन नकाशावर ते अधिक ठळक होण्यास मदत होणार आहे. कवितेची राजधानी अशी ओळख असलेलं मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे आता पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जाणार असून, त्याचा लोकार्पण सोहळा आज (२० एप्रिल २०२५) मोठ्या उत्साहात पार पडला. राज्याचे मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक यांच्या उपस्थितीत हे लोकार्पण झालं. कवी केशवसुत स्मारकात उभारण्यात आलेल्या कोकण साहित्य सन्मान दालनाचं उद्घाटनही या वेळी झालं. (व्हिडिओ आणि फोटो बातमीच्या शेवटी दिले आहेत.)
‘कोमसाप’च्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, कवी अरुण म्हात्रे, नाटककार गंगाराम गवाणकर, मराठी भाषा विभागाचे संचालक डॉ. श्यामकांत देवरे, मालगुंडच्या सरपंच श्वेता थेऊर, ‘कोमसाप’चे विश्वस्त प्रमुख रमेश कीर, ‘कोमसाप’चे केंद्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, जयू भाटकर, प्रकाश देशपांडे, तानाजीराव चोरगे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
‘साहित्यिक नसतील, तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही. कोकणाने महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले, तेवढे कोणत्याच प्रांताने दिले नाहीत. कोकण आणि रत्नागिरी साहित्याच्या दृष्टीने प्रगत आहे. ते साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी केलं, तर ती खऱ्या अर्थाने केशवसुतांना श्रद्धांजली ठरेल,’ असं प्रतिपादन डॉ. उदय सामंत यांनी केलं. विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख रुपये केली जाणार असल्याची घोषणा या वेळी उदय सामंत यांनी केली. तसंच कवी केशवसुत स्मारकाच्या नूतनीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी केली. कवी केशवसुतांचं प्रेरणादायी स्मारक स्थानिक नागरिकांनी, तसंच पुढच्या पिढीनेही पाहण्याची गरज आहे. म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातल्या शाळांच्या सहली जेव्हा या भागात येतील, तेव्हा त्या सहलीतल्या मुलांना केशवसुत स्मारकात आणणं बंधनकारक करावं, अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना द्याव्यात, अशा सूचना डॉ. सामंत यांनी या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, एकनाथांनी अभंग लिहिले, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला, त्याच वेळेला मराठी भाषा अभिजात झालेली होती. आता तांत्रिकदृष्ट्या त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे, असं सामंत म्हणाले आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद मोदी यांचे त्यांनी आभार मानले.
मालगुंड हे कवितेचं गाव झाल्यामुळे ते जगाच्या नकाशावर येणार आहे, अशी प्रातिनिधिक भावना या वेळी मान्यवरांकडून व्यक्त झाली. या उपक्रमात मालगुंडमधल्या ३०, तर जवळच्या गणपतीपुळे गावातल्या पाच घरांचा समावेश करण्यात आला आहे. या घरांमध्ये पुस्तकं ठेवली जाणार आहेत. त्यापैकी दोन दालनांचं आज प्रातिनिधिक स्वरूपात उद्घाटन झालं. या दालनांमध्ये पर्यटकांना दिवसभर वाचनाचा आनंद घेता येणार असून, त्यांच्या आदरातिथ्यातून संबंधित कुटुंबांच्या अर्थार्जनालाही हातभार लागणार आहे.
कवी केशवसुत मालगुंडला जन्माला आले हे महाराष्ट्राचं भाग्य असल्याची भावना व्यक्त करून मधू मंगेश कर्णिक यांनी मालगुंड हे पुस्तकांचं गाव झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसंच, बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नांना यश आल्याचं सांगितलं. येत्या २८ एप्रिल रोजी मधुभाईंचा ९५वा वाढदिवस आहे. त्या औचित्याने कार्यक्रमाच्या शेवटी मधुभाईंना ‘कोमसाप’कडून पाच लक्ष रुपयांची थैली भेट देण्यात आली.
डॉ. देवरे यांनी पुस्तकांचं गाव या उपक्रमामागची शासनाची भूमिका सांगितली. नमिता कीर यांनीही मनोगत व्यक्त केलं. विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. साहित्यिकांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. नंतर महिलांनी स्वागतगीत सादर केलं. निवेदिका मृण्मयी भजक यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं, तर आनंद शेलार यांनी आभारप्रदर्शन केलं. कवी अरुण म्हात्रे यांनी ‘नवा शिपाई’ ही केशवसुतांची कविता सादर केली. या वेळी जाखडी नृत्य, कोळी नृत्य आदी लोककलांचं सादरीकरणही झालं. साहित्यप्रेमी नागरिक, तसंच ग्रामस्थ आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड






