मालगुंड : मराठी साहित्यातील समाजपरिवर्तक साहित्यिक कवी केशवसुत यांच्या शतकोत्तर पंचावन्नाव्या जयंतीनिमित्ताने मालगुंड येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांच्या सकारात्मक विचारांचे स्मरण करण्यात आले.
कोकण मराठी साहित्य परिषदेची मालगुंड शाखा, कवी केशवसुत स्मारक आणि कवी केशवसुत सार्वजनिक वाचनालय तसेच मालगुंड येथील ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीच्या पुढाकाराने ७ ऑक्टोबर रोजी केशवसुतांच्या १५५ व्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला. केशवसुतांच्या पुतळ्याला कोमसापच्या मालगुंड शाखेचे कार्यकारिणी सदस्य रामानंद लिमये यांनी पुष्पहार अर्पण केला. कवी केशवसुत यांनी कवितांमधून तत्कालीन समाज-रूढींवर केलेले प्रहार या विषयावर आपले विचार मांडले. केशवसुतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून तत्कालीन रूढी, वाईट परंपरा, अनिष्ट चालीरीती, विघातक व्यवस्था यांच्यावर हल्ले करतानाच मानसिक गुलामगिरीत अडकलेल्या लोकांना सकारात्मकतेची नवी उमेद दिली. त्यामुळे समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यासाठी त्यांच्या कविता आजही दिशादर्शक आहेत, असे त्यांनी सांगितले.
गझलकार अमेय धोपटकर यांनी केशवसुतांच्या कवितांचा आढावा घेत त्यांच्या कवितांच्या प्रेरणा आणि त्यातील आलंकारिकता मांडून त्यांच्या विविध कवितांचे महत्त्व सादर केले. संचित जोशी यांच्यासह केशवसुतांच्या कविता चालींसह सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली.
कोमसाप दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष कवी अरुण मोर्ये यांनी केशवसुतांच्या आणि विविध सामाजिक विषयांना स्पर्श करणाऱ्या स्वरचित कविता सादर केल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा विश्वस्त मधु मंगेश कर्णिक यांनी केशवसुतांच्या जन्मघराची स्मारक म्हणून सर्वदूर प्रसिद्धी केली. आपण सर्वांनी हा वारसा जपत केशवसुतांचे विचार समाजासमोर आणण्याची आवश्यकता आहे. कारण भविष्यातील तरुण पिढीला हेच साहित्य प्रेरणा देण्याचे कार्य करील.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोमसाप मालगुंड शाखेच्या अध्यक्षा नलिनी खेर, सूत्रसंचालन युवाशक्तीच्या प्रमुख स्मिता बापट यांनी केले. मालगुंड शाखेच्या कार्याध्यक्षा शुभदा मुळ्ये यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कोमसाप मालगुंड शाखेचे खजिनदार विद्याधर तांदळे, रामानंद लिमये, दीपाली केळकर, अप्पा आग्रे, राजेश सनगरे, कमलाकर थूळ यांच्यासह विद्यार्थी, साहित्यरसिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमेय धोपटकर, अरुण मोर्ये, स्वप्नेश राजवाडकर, कुमार डांगे, स्मारक व्यवस्थापन समितीचे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड