रत्नागिरी : मालगुंड हे पुस्तकांचे गाव – आणि कोकण साहित्य सन्मान दालनाचे येत्या रविवारी (दि. २० एप्रिल) मालगुंड येथे उद्घाटन होणार आहे.
महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीने वाचन चळवळ वाढीस लागावी आणि साहित्य चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम सुरू केला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर केले. त्यानुसार महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पुस्तकांचे गाव उपक्रमाचे आणि कोकणातील साहित्यिकांची माहिती देणाऱ्या कोकणसाहित्य सन्मान दालनाचे उद्घाटन रविवारी उदय सामंत यांच्या हस्ते आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केले.
त्या पुढे म्हणाल्या की, २०१७ पासून वाचन संस्कृतीच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र शासनाने पुस्तकाचे गाव हा उपक्रम सुरू केला आहे. तेव्हापासून कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावास पुस्तकाचे गाव म्हणून मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. साहित्य क्षेत्रात मालगुंड गावाला खुप मानाचे स्थान आहे. कविश्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांनी मालगुंड ही आधुनिक कवितेची राजधानी असून कवी केशवसुत स्मारक हे साहित्याची पंढरी असल्याचे सांगितले होते. अनेक साहित्यिकांनी या स्मारकाचे कौतुक केले होते. या सर्व बाबींचा विचार करून शासन दरबारी सुरू असलेल्या आमच्या प्रयत्नाला विद्यमान मराठी भाषा व उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. सामंत यांच्या पुढाकाराने यश मिळाले आहे. त्यांच्याच हस्ते पुस्तकांचे गाव उपक्रमाचा प्रारंभ होत आहे.
सौ. कीर यांनी पुस्तकाच्या गावाची पूर्ण संकल्पना सादर करून यामुळे पर्यटकांना मिळणारा वाचनाचा फायदा, या भागात वाढणारे पर्यटन आणि त्याद्वारे होणारे अर्थार्जन याबाबत माहिती दिली. या संकल्पनेचे कामकाज कसे असणार याबाबतही माहिती देऊन मालगुंड गावात हे होत असल्याने खूप आनंद होत असल्याचे सांगितले. उपक्रमाची रचना, कार्यवाही याबाबतची माहिती त्यांनी दिली. जिल्हावासीयांसाठी अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण असल्याचे सांगून सर्वांनी या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
पत्रकार परिषदेस उपस्थित असलेले कोकण मराठी साहित्य परिषदेचे विश्वस्त प्रमुख रमेश कीर यांनी सांगितले की, पुस्तकांचे गाव हा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम असून उदय सामंत यांच्यामुळेच हा उपक्रम पूर्णत्वास जात आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून राज्य जर अत्यंत सकारात्मक असेल तर आपण सर्वांनी मिळून यात सहभागी होणे ही जबाबदारी आहे.
पत्रकार परिषदेला कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन पाटील, कोमसाप रत्नागिरी जिल्ह्याचे अध्यक्ष प्रा. आनंद शेलार, कार्यवाह माधव अंकलगे उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

