मालवण : आचरे (मालवण) येथील साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या निवड मंडळाने एकमताने ठाकूर गुरुजी यांची निवड केली. अखिल भारतीय साने गुरुजी केंद्रीय समितीचे अध्यक्ष हसन देसाई (कोल्हापूर), सचिव सुनील पुजारी (सोलापूर) यांनी आज कोल्हापूर येथे जाहीर केले. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे 11 जानेवारी रोजी कथामालेच्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे.
कथामाला संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकरांच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा आज गौरव झाला आहे, अशा शब्दांत अ. भा. साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.
सुरेश ठाकूर गेला अर्धशतकाहून जास्त काळ बालसेवेचे कार्य अविरत करीत आहेत. १९७२ पासून ते साने गुरुजी कथामालेचे कार्य आपल्या सहकाऱ्यांसोबत तन, मन आणि धन अर्पण करून करीत आहेत. ‘करी रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे’ हा साने गुरुजींचा मूलमंत्र प्रमाण मानून त्यांनी कोकण विभागात ‘शाळा तेथे कथामाला’ हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी सत्तरच्यावर कथामाला तंत्र आणि मंत्र याविषयावर मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत. मुलांना कथा कशा सांगाव्यात, या विषयावर त्यांची आकाशवाणीच्या मुंबई, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग केंद्रावरून प्रबोधने झालेली आहेत. मुंबई दूरदर्शनवरून ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ या विषयासंबंधी त्यांची मुलाखत तत्कालीन दूरदर्शन कार्यक्रम संचालक विनायक चासकर यांनी प्रसारित केली होती. गेले अर्धशतक मालवण कथामालेच्या माध्यमातून ते तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे करीत आहेत. शालेय मुलांसाठी आकाशदर्शन, पक्षिनिरीक्षण, पाणपोई यासारखे अनेक उपक्रम आपल्या कथामाला सवंगड्यांमार्फत त्यांनी राबविले. 1978 साली आचरे येथे आनंद बालनाट्य मंडळ ही संस्था स्थापन करून त्या बालनाट्य मंडळामार्फत वीसहून अधिक बालएकांकिका सादर केले. त्यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. त्यांच्या ‘रंगरंगीले छैल छबीले’, ‘मर्कट कथा’, ‘मिशी हरवली आहे’, ‘अगडम बगडम झगडा खतम’, ‘नारद झाला गारद’, या एकांकिका रसिकांच्या मनात आजही आहेत. त्यामुळे एक हजारच्यावर बालकलाकारांना रंगमंच प्राप्त झाला. बालरंगभूमीच्या कार्यासाठी त्यांना पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, अनंत भावे, पुष्पा भावे आदींकडून पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी बालरंगभूमीच्या कार्यासाठी श्रीनिवास नार्वेकर यांनी नाट्यतपस्वी आत्माराम सावंत पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी या बुजुर्गांच्या हस्ते त्यांना प्राप्त झाला.
कथामालेच्या कार्यासाठी यापूर्वी त्यांना विधान परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब भारदे, माजी शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनी गौरविले आहे. कथामालेची सेवामयी व्यक्तिमत्त्वे प्रकाशभाई मोहाडीकर, मधुभाई नाशिककर, यदुनाथ थत्ते, राम शेवाळकर, अॅड. चंद्रशेखर धर्माधिकारी, राजाभाऊ मंगळवेढेकर, हरिभाऊ दामले, प्र. दी. पुराणिक आदींचा त्यांना दीर्घ सहवास लाभला. आज वयाची सत्तरी पार करूनही आणि त्यांच्या एका अवघडे शस्त्रक्रियेनंतरही त्यांची बालसेवा अविरत सुरू आहे. माझ्या तनामनात कथामालेचे बीज रुजविणारे मधु वालावलकर, ज्ञानेश देऊलकर, श्रीपाद तोंडवळकर, प्र. के. वालावलकर, श्रीपाद पराडकर आणि चिंतामणी विश्राम धुरी या मालवणच्या विभूतींना हा पुरस्कार समर्पित करतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड







