रत्नागिरी : समाजप्रबोधनाचा वसा जोपासत गेली चौदा वर्षे रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या पंधराव्या कीर्तनसंध्या महोत्सवात यावर्षी ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत महाभारत या विषयाचा उत्तरार्ध राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे उलगडणार आहेत.
सन २०१२ पासून गेली चौदा वर्षे कीर्तनसंध्या महोत्सवात भारताचा देदीप्यमान इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम जाणीवपूर्वक केले जात आहे. रामायणानंतर महाभारत या प्राचीन भारत आणि जगातील सर्वांत मोठ्या महाकाव्यातील काही भाग गेल्या वर्षीच्या महोत्सवात सादर करण्यात आला होता. महाभारत ग्रंथ भारताच्या धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या महाभारताचा भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट आहे. हा ग्रंथ ग्रीक महाकाव्ये इलियड व ओडिसी यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ इसवी सनपूर्व २००० इतका मागे जाऊ शकतो. महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या भारतवर्षाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. मात्र ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगीकारावी, महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष गुणविशेष दर्शवले आहेत. या साऱ्या इतिहासाचा सुरुवातीचा काही भाग आफळे बुवांनी गेल्या वर्षीच्या कीर्तनसंध्या महोत्सवात समजावून सांगितला होता. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली)
यावर्षी ६ ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रत्नागिरीच्या स्व. प्रमोद महाजन क्रीडासंकुल होणार आहे. नीटनेटके आयोजन, प्रशस्त बैठक व्यवस्था असणारा कीर्तनसंध्या महोत्सव असून महोत्सवात नेहमीप्रमाणेच सर्व व्यवस्था असणार आहे. सलग सहा दिवस दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत चार तास चालणाऱ्या कीर्तनातून रसिक श्रोत्यांना इतिहासाचा अनोखा अनुभव घेता येणार आहे. गेल्या वर्षी महाभारताच्या पूर्वार्धावर निरूपण करण्यात आले. पांडव–कौरवांचे संघर्ष, त्यांचे निर्णय, त्यांची मूल्ये आणि धर्म–अधर्माच्या सीमारेषा यांचा त्यात समावेश होता. यावर्षी महाभारताच्या उत्तरार्धात महान संग्रामाच्या निर्णायक वळणाचे निरूपण करण्यात येणार आहे. कुरुक्षेत्राच्या रणभूमीत उतरणाऱ्या प्रत्येक योद्ध्याच्या मनातील भावविश्व, धैर्य, अढळ निश्चय आणि कर्तव्यनिष्ठा यांचे विवरण हभप चारुदत्तबुवा आफळे नेहमीच्याच शैलीत रंगविणार आहेत. एकूण चोवीस तासांचे इतिहास सादरीकरण हे या महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य असेल. महोत्सवाचे मुख्य प्रायोजकत्व पितांबरीने स्वीकारले आहे.
कीर्तनसंध्या २०२६ या महोत्सवात नामवंत कलाकारांची प्रभावी साथसंगत लाभणार असून त्यामध्ये तबला – केदार लिंगायत, पखवाज – मंगेश चव्हाण, ऑर्गन – चैतन्य पटवर्धन, व्हायोलिन – उदय गोखले, तालवाद्य – हरेश केळकर, बासरी – मंदार जोशी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे निवेदन निबंध कानिटकर करणार आहेत.
कीर्तन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून देणगी सन्मानिका कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध असतील. इतिहास, भक्ती, विचार आणि संस्कार यांचा संगम अनुभवण्यासाठी नागरिकांनी या कीर्तन महोत्सवाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन कीर्तनसंध्या परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अवधूत जोशी (९०११६६२२२०) यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




