Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ती : तृतीयपंथीयांच्या समस्या आणि समाजाची दृष्टी

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी जालना येथील नाट्यांकूर संस्थेने ती हे नाटक सादर केले.

जालना येथील नाट्यांकूर संस्थेने ती हे नाटक सादर केले. लेखक सतीश विष्णू लिंगडे आणि दिग्दर्शक सुमित सुनील शर्मा आहेत. एका तृतीयपंथीयाने सांभाळलेल्या अनाथ मुलीच्या कथानकावर आधारित हे नाटक आहे.

रंगमंचावर पडदा उघडताच धनीशेठ त्याच्या नको असलेल्या मुलीला ‘अम्मा’कडे घेऊन येतो आणि ”हिला तू सांभाळ”, अशी विनंती करतोय अम्मा त्याला नकार देते. मात्र करिष्मा तिला सांभाळायला तयार होते. तृतीयपंथी व्यक्ती नैना, माधुरी, रेश्मा, करिष्मा इत्यादी यांना समाजात अन्यत्र ठिकाण नसल्याने ‘अम्मा’ने आपल्या घरात स्थान दिलेले असते. अम्मा प्रमुख असते. ती रोज यांच्या कामांची वाटणी करते, तिच्या घरामध्ये मुन्ना, पक्या हे परिसरातील मवाली, गुंड यांचा वावर असल्याने ते यांना त्रास देत असतात.

करिष्माला भीक मागतांना स्टॅण्डवर राघव भेटतो, त्याच्याकडे भीक मागितल्यावर ”भीक कसली मागता? काही कामधंदा करा!” असे तो सुनावतो. घरी येऊन करिष्मा याबद्दल विचार करते. करिष्माने सांभाळायला घेतलेली मुलगी ‘बेबी’ मोठी झालेली असते, ती स्पर्धापरीक्षा देत असते, तीही करिष्माला भीक मागण्याचा धंदा सोडून काहीतरी व्यवसाय करण्याचे सुचविते.

करिष्मा मग फुलांचे गजरे विकण्याचा व्यवसाय सुरू करते, पुन्हा राघवची तिची भेट होते, वारंवार ती दोघे भेटतात व एकमेकांच्या प्रेमात पडतात. राघव तिला लग्नाची मागणी घालतो. मात्र लग्न न करता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहतात. राघवची मैत्रीण मनस्विनी त्याला भेटायला येते, तिला हा प्रकार समजल्यावर ती निघून जाते, अम्मा व इतर तृतीयपंथी करिष्माला ”हे नातं स्वीकारलं जाणार नाही” असे सांगतात, पण करिष्मा त्यांचे ऐकत नाही व ती एकत्रच राहतात.

राघवची आई करिष्माला भेटते व तिला ”तू आमची वंशवेल पुढे नेऊ शकत नाहीस. सबब तुला स्वीकारू शकत नाही”, असे सांगते.
करिष्मा पुन्हा अम्माकडे येते. दरम्यान बेबीचा स्पर्धापरीक्षेचा अंतिम निकाल लागतो व ती करिष्माला अम्माच्या घरातून घेऊन जायला येते.

नेपथ्यरचनेत झोपडपट्टीतील ‘अम्मा’चे घर व देवीचा देव्हारा आहे. प्रकाशयोजनेद्वारे रंगमंचावर वेगवेगळ्या भागात एसटी स्टॅन्ड, सिग्नल व इतर ठिकाणे दाखवली आहेत. राघव व करिष्मा यांच्या घराचा दिवाणखाना दाखविण्यात आला आहे. नाटकाच्या नावातील ‘ती’ म्हणजेच धनीशेठची सांभाळायला घेतलेली मुलगी. तिच्याबद्दल, ती लहानाची मोठी होतानाची तिची मानसिकता, तिचे भावविश्व, घुसमट याबद्दल नाटकात फारसे प्रसंग-भाष्य आढळत नाही. नाटकाचा रोख तृतीयपंथीयांच्या समस्या व त्यांच्याकडे समाजाची बघण्याची दृष्टी यांच्याकडेच वळतो. काही प्रसंग जास्त भडकरीत्या सादर केल्याने नाटकाची दिशा बदलल्याचे जाणवते. लेखकाला वेगळा संदेश द्यायचा असूनही त्याची मांडणी विस्कळीत झाल्याने आवश्यक तो परिणाम साधला गेलाय क, हा प्रश्न पडतो.

श्रेयनामावली
संस्था – नाट्यांकूर, जालना
लेखक – सतीश विष्णु लिंगडे
दिग्दर्शक – सुमित सुनिल शर्मा
संगीत – नीलेश सपकाळ, आनंद घुले
रंगभूषा- वर्षाराणी कोळवले
नेपथ्य- मिलिंद दुसे, मुकुंद दुसे, संजय भिंगारे
प्रकाशयोजना – संतोष गौतम, रेणू जोशी
वेशभूषा – संध्या शर्मा
रंगमंच सहाय्य – सुनील गव्हाणे

पात्रपरिचय
नैना/करिष्मा – सुमित शर्मा
अम्मा – सतीश लिंगडे
माधुरी – गणेश लोखंडे
रेश्मा – आकाश ओहाळ
बेबी – सानवी संबरकर
मुन्ना – विनोद जैतमहाल
पक्या – पवनकुमार खांदे
धनीसेठ – सुंदर कुंवपुरिया
राघव – कपिल रोडगे
प्रा. स्मिता देवकर – रेखा चव्हाण
चहावाला – सोहन भुरेवाल
मनस्विनी – गौरी गिल्डा
वकील व वाटसरू – ज्ञानेश्वर म्हळसणे
वाटसरू – आनंद घुले, प्रेरणा सराफ, शोएब शेख, अथांग लिंगडे, मंथन लिंगडे, लखन मुंगसे, अमोल सराटै

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version