Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

ग्रंथदिंडी, ध्वज फडकवून ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा प्रारंभ

Advertisements

चिपळूण : मांडकी-पालवण (ता. चिपळूण) येथे आज सायंकाळी ग्रंथदिंडी आणि संमेलनाचा ध्वज फडकवून तीन दिवसांच्या ग्रामीण, कृषी, सहकार साहित्य संमेलनाचा थाटात प्रारंभ झाला.

महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक जडणघडणीत ग्रामीण जीवन, शेती आणि सहकार यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. या तिन्ही क्षेत्रांचे साहित्यिक, वैचारिक आणि अनुभवाधारित दर्शन घडवणारे राज्यस्तरीय ग्रामीण, कृषी व सहकार मराठी साहित्य संमेलन मांडकी–पालवण येथे आयोजित करण्यात आले आहे. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेने संस्थेच्या प्रशस्त क्रीडांगणावर हे संमेलन भरत आहे.

या संमेलनातील ग्रंथदिंडी हे प्रमुख आकर्षण ठरले. आज सायंकाळी ही ग्रंथदिंडी निघाली. संमेलनाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, संमेलनाचे समन्वयक प्रकाश देशपांडे, आमदार शेखर निकम यांच्यासह अन्य मान्यवर ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झाले.

ग्रंथदिंडी संमेलनाच्या ठिकाणी आल्यानंतर संमेलनाचा ध्वज फडविण्यात आला. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही झाले.

शनिवारी, दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी संमेलनाचे उद्घाटन, ग्रामीण साहित्यातील कोकण, ग्रामीण साहित्य काल-आज-उद्या, ग्रामीण कथाकथन, सहकार साहित्य व सहकारातून समृद्धी तसेच ग्रामीण कविसंमेलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. रविवारी, दि. १५ फेब्रुवारी रोजी कृषी साहित्य व शेती सुधारणा, सहकारविषयक मुलाखत, ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयावरील परिसंवाद, मान्यवरांचा सत्कार, प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर केल्या जातील. त्यानंतर सायंकाळी समारोप समारंभ पार पडणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी सांगितले.

या राज्यस्तरीय संमेलनाला अभिनेते संजय खापरे व ‘हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. “साहित्यातील शब्दांचा उत्सव, शेतीचा संघर्ष आणि सहकारातून समृद्धी या विषयांवर नामवंत साहित्यिकांचे विचार ऐकण्याची ही उत्तम संधी आहे.

संमेलनाचे प्रमुख कार्यवाह म्हणून डॉ. निखिल चोरगे, तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून प्रकाश देशपांडे काम पाहत आहेत. राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कृषी तज्ज्ञ व सहकार क्षेत्रातील मान्यवर या संमेलनात सहभागी होणार आहेत.

उद्घाटक म्हणून खासदार शरद पवार, प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तर समारोप अध्यक्ष म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची उपस्थिती लाभणार आहे. शरद पवार आणि खासदार नारायण राणे यांच्या प्रकृतिअस्वास्थ्यामुळे उपस्थितीबाबत अनिश्चितता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version