Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

हायब्रीड : स्त्री आणि शेतीच्या नैसर्गिक आईपणाची गोष्ट

Advertisements

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी चंदगडच्या श्रीसाई नाट्यधारा संस्थेने हायब्रीड हे नाटक सादर केले.

स्त्री आणि शेती यांच्या सद्यःस्थितीचे अनेक कंगोरे, शेतीचे नैसर्गिक आईपण दाखवून संकरित वाणाच्या उपयोगानंतर काय होऊ शकते, याचे नाट्य हायब्रीड नाटकात घडविण्यात आले आहे.

पडदा उघडताच उमाचा भाऊ अंकुश तिला त्याच्या मुलाच्या बारशाचे निमंत्रण द्यायला व माहेरी न्यायला आलेला आहे आणि सासू आक्काची कटकट / बडबड चालली आहे ”सून उमाला मूल होत नाही, घराण्याला वारस नाही, कितीही प्रयत्न केले तरी काही उपयोग नाही. तिला कायमचीच घेऊन जा. घटस्फोट द्या.”

उमाचे नवरा पंढरीचा चुलतभाऊ गणेश व त्याची पत्नी सरिता ही आक्काला समजावत आहेत, अंकुश आक्काला म्हणतो, ”दोष फक्त माझ्या बहिणीत आहे असं म्हणून कसं चालेल? भाऊजींच्यामध्येही असू शकतो.” त्यावर उमा भावाला पंढरीविषयी काही बोलू नकोस असे सांगून गप्प करते. अंकुश उमाला विचारतो, ”तू येतेस काय?” ती नाही म्हणते व अंकुश निघून जातो.

तेवढ्यात पंढरी वावरातून येतो तो चिंताग्रस्त झालेला असतो. कारण शेतात गुढगाभर पाणी साचलेले असते व भुईमुगाची सर्व शेती वाया जाते. पंढरी, गणेश वाया गेलेल्या पिकाच्या विमा मिळण्यासाठी कागदपत्रे गोळा करायला लागतात, तर आक्का एका डॉक्टरला घेऊन येते व सून उमाला मूल का होत नाही, यावर काहीतरी उपाय सांगा असे डॉक्टरांना सांगते. डॉक्टर तपासून उमाचे गर्भाशय नाजूक असल्याने गर्भधारणा होत नसल्याचे निदान करतात व आधुनिक तंत्रज्ञानाने ती आई होऊ शकेल, असा उपचार सुचवितात. मात्र हा खर्चीक उपचार आहे व कदाचित एक/दोन वेळा करावा लागेल, असेही सांगतात. आक्का डॉक्टरांनी उमासाठी सांगितलेला उपचार करा म्हणून हट्टाला पेटते, रागाने घरी न राहता शेजारी गणेशकडे जाऊन राहायला लागते.

आक्काच्या भावालाही मूलबाळ नसते. भावजयीचे निधन लवकर झाल्यानंतर भावाला एकट्याने जगणे कष्टप्रद होते. त्याचे निधन झाल्याचेही कोणाला लगेच कळत नाही. चार दिवसांनी कळते. अशी परिस्थिती पंढरी-उमावर येऊ नये म्हणून ती सारखा आग्रह धरत असते.

यावर्षी कापसाचे पीक पंढरीला खूप फायदेशीर ठरते. एवढे उत्पन्न घेतल्याबद्दल पंढरीचा सत्कार होतो व त्याने राबविलेल्या पॅटर्नला ‘बागलाण’ पॅटर्न असे नाव दिले जाते.

पंढरी व उमा उपचार करून घेतात, पण पहिल्या प्रयत्नांना यश येत नाही. आर्थिक ओढाताण असतेच, मात्र आक्काचा तगादा असल्यामुळे दुसऱ्यांदा उपचार करून घेतले जातात. नंतर उमाला गर्भधारणा होते. त्यासाठी पंढरी उधारउसनवारी करून पैसे जमवितो.
उमाची तब्बेत दिवसेंदिवस अशक्त होत जाते. डॉक्टर काळजी घ्यायला सांगतात. देणी भागवताना पंढरीची दमछाक होते. त्यातच नवीन पीक पेरलेले असते. त्यासाठी खताला पैसे नसतात. खत सहज उपलब्ध नसल्याने काळ्या बाजारात चढ्या दराने खत विकत घ्यावे लागत असते. पैशांअभावी खत आणता येत नसल्याने पंढरीची घालमेल होत असते. उमा हे पाहून तिला तिच्या आईने दिलेल्या बांगड्या पंढरीला देते व खत आणा असे सांगते. दरम्यान, उमाचे दिवस भरतात व तिची प्रसूती होते. मुलगा होतो मात्र दुदैवाने प्रसूतीदरम्यान उमाचा मृत्यू होतो.

काही दिवसांत प्रगतिशील शेतकरी म्हणून पंढरीची मुलाखत प्रसारमाध्यमांमध्ये होते.

नाटकाच्या नेपथ्यामध्ये गावातील पंढरीचे घर, पंढरीच्या सत्काराच्या सभेचे ठिकाण, शेवटची प्रसार माध्यमांमधील मुलाखत यावेळी बदल करून नावीन्य आणण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाशयोजनेद्वारे काही प्रसंग उठावदार करण्याचा प्रयत्न केला आहे पंढरीच्या सत्कार समारंभाचा जल्लोष, उमाला होणारे भास असे काही प्रसंग आहेत. पार्श्वसंगीताने या प्रसंगांना मदत झाली आहे.

पंढरी व त्याचे कुटुंबीय, त्याच्या भोवतालचे मित्र व माणसे यांच्यातील संवादाच्या, घटनांच्या माध्यमातून स्त्री आणि शेती यांच्या सद्यःस्थितीचे अनेक कंगोरे, शेतीच्या नैसर्गिक आईपणाची गोष्ट तसेच खत, बियाणे, एकूणच शेतीविषयक व्यवस्था खिळखिळी कशी झाली आहे, शेतकऱ्याला कोणी वाली कसा नाही, जादा व लवकर उत्पन्न मिळवण्याच्या नादात शेतीचा पोत कसा बिघडत चालला आहे, त्याचा दूरगामी वाईट परिणाम पुढच्या पिढ्यांवर कसा होत जाणार आहे, ही गोष्ट हायब्रिड नाटकात उलगडून दाखविण्याचा प्रयत्न आहे.

श्रेयनामावली
नाटक : हायब्रीड
संस्था : श्रीसाई नाट्यधारा, चंदगड
लेखन – नितीन सावळे
दिग्दर्शक – प्रा. परसू गावडे
नेपथ्य : गिरीशा पाटील
पार्श्वसंगीत : राणी लोहार
प्रकाशयोजना : राजेश शिंदे
वेशभूषा : आप्पा गावडे, अनुराधा काकतकर

पात्रपरिचय
राधिका शिंदे – आक्का
परसू गावडे – पंढरी
श्रेया सव्वाशेरी – उमा
मनाली पाटील – सरिता
जयदीप कोडोलीकर – गणेश
आप्पा गावडे – संदीप
सक्षम जाधव – पप्या
निहाल रुकडीकर – युवराज
कुणाल हिरोजी – अंकुश
अनुराधा काकतकर – डॉक्टर
प्राची कदम – बच्छी
चिन्मय शेंडे – कमिशन
मंदार बापट – राठोड
इसम – स्वराज पाटील, गुणीश पाटील, अनुष्का जाधव,
सक्षम जाधव, आयुष देसुरकर, सुमित मुचंडी

(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version