राज्य बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी प्रथमच रत्नागिरीत

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेली एकविसावी राज्य बाल नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी रत्नागिरीत होत आहे. अंतिम फेरी रत्नागिरीत प्रथमच होत आहे.

रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या काळात स्पर्धेतील नाटके सादर होणार आहेत.प्राथमिक फेरीतून पात्र झालेले राज्यभरातील एकूण ३२ संघ या अंतिम फेरीमध्ये आपले बालनाट्य सादर करणार आहेत. रत्नागिरीत आतापर्यंत गद्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आणि संगीत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी झाली आहे. बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पहिल्यांदाच रत्नागिरीमध्ये होत आहे. या फेरीमध्ये सुमारे ५०० पेक्षाहून अधिक बालकलाकार आपली कला सादर करणार आहेत.

राज्यभरातून येणाऱ्या संघांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, संभाजीनगर, अहिल्यानगर, जळगाव, परभणी, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर, कल्याण, यवतमाळ, अकोला, नंदुरबार, भुसावळ, नाशिक, सांगली, नांदेड, अमरावती आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथून संघ सहभागी होणार आहेत. स्पर्धा रत्नागिरीत होत असूनही त्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील एकाही नाटकाचा स्पर्धेत समावेश नाही.

स्पर्धेचे उद्घाटन १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात होणार आहे. त्यानंतर १२ ते १४ आणि १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत स्पर्धा पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार आणि मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीमधील स्पर्धक संघांचे मनोधैर्य वाढवण्याकरिता, त्यांना शुभेच्छा देण्याकरिता आणि विविध विषयांवरची विविधांगी बालनाट्ये पाहण्याकरिता रत्नागिरीमधील सर्व शाळांनी आपापल्या शाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही स्पर्धा पाहण्याकरिता नाट्यगृहावर घेऊन यावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेचे समन्वयक म्हणून नंदू जुवेकर काम पाहत आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply