ताणतणावावरील उपाययोजनेकरिता संस्कृतचे संशोधन आवश्यक : धनंजय कुलकर्णी

रत्नागिरी : आधुनिक काळातील ताणतणावाच्या जीवनात स्वास्थ्य मिळवण्यासाठी संस्कृत वाचन, पठणातून काही उपाययोजना करता येते का, याचे संशोधन व्हायला हवे, असे प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले.

उज्जैन येथील महर्षी सांदीपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान आणि रामटेक येथील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरीतल्या भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रातर्फे तीन दिवसांचे क्षेत्रीय वैदिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रत्नागिरीतील माधवराव मुळ्ये भवनात या संमेलनाचे आज (सात फेब्रुवारी) उद्घाटन झाले.‌ त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. संस्कृत ही भारताची पुरातन भाषा आहे. तिचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत; पण या भाषेचा उपयोग पोथ्या आणि पुराणांमध्ये राहिला आहे. त्यापलीकडे जाऊन आधुनिक काळातील प्रश्न सोडविण्यासाठी या भाषेचा आणि त्यातील वाङ्मयाचा उपयोग होतो का, याचाही अभ्यास केला पाहिजे, असे श्री. कुलकर्णी म्हणाले. (उर्वरित बातमी जाहिरातीच्या खाली आहे.)

पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख गणेश थिटे यांनी चाळीस वर्षांपूर्वी १९८५ साली पुण्यात झालेल्या पहिल्या वैदिक संमेलनाची माहिती दिली. हरिद्वार येथे अलीकडेच झालेल्या एका संमेलनात सैन्यातील निवृत्त अधिकारी असलेल्या उत्तराखंडच्या राज्यपालांनी सैन्यात असताना सैनिकांना वेदांपासून कशी स्फूर्ती मिळते, हे सांगितल्याची आठवण श्री. थिटे यांनी सांगितली.

कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, की संस्कृत हा भारताचा आत्मा आहे, तर वेद हा संस्कृतचा आत्मा आहे. त्यामुळेच जगभरात कोठेही लिखित स्वरूपात पुरातन संस्कृत साहित्य असेल तर ते जतन करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठरविले आहे. जगभरातील सर्व संप्रदायांचे मूळ वेदांत आहे; मात्र वेदांचे अर्थासह पठण करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक दिनकर मराठे यांनी प्रास्ताविक केले.

उद्घाटन समारंभानंतर माधवराव मुळ्ये भवन, रत्नागिरी कर्‍हाडे ब्राह्मण संघाचे राणी लक्ष्मीबाई सभागृह, वेदपाठशाळा आणि गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदांमधील ऋचांचे पारायण करण्यात आले.

या संमेलनाला महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून सुमारे १०० प्रतिनिधी उपस्थित आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply