रत्नागिरीतील कार्यशाळेत संस्कृतमधील २४०० शब्दांच्या मराठी प्रतिशब्दांचा शोध

रत्नागिरी : वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोग (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्राच्या संयुक्त विद्यमाने संस्कृतमधील २४०० शब्दांना मराठी प्रतिशब्द शोधण्यात आले.

भारतातील ज्ञानपरंपरा आणि प्रथांची विद्यार्थ्यांसाठी परिभाषा-कोश (संस्कृत–मराठी) भारतीय ज्ञानपरंपरेचा शिक्षार्थी कोश निर्मिती या विषयावर पाच दिवसांची कार्यशाळा संस्कृत उपकेंद्रात झाली.

संस्कृत भाषेतील शब्दांना मराठीतील शब्द शोधण्यासाठी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील मराठी विभागातील डॉ. निधी पटवर्धन, प्रा. प्रज्ञा भट, रत्नागिरी उपकेंद्रातील प्रा. अविनाश चव्हाण, प्रा. कश्मिरा दळी, संस्कृत अभ्यासिका अक्षया भागवत, बेंगळुरू येथील अगस्त्य गुरुकुलातील सहाय्यक आचार्या प्रा. पूर्वा चुनेकर, प्रकल्प सहाय्यक व संशोधिका प्रा. सई ओक, दूरस्थ आणि ऑनलाइन शिक्षण केंद्राचे समन्वयक स्वरूप काणे या सर्वांनी शब्दांवर सखोल व साधकबाधक चर्चा करत आणि भारतीय ज्ञानप्रणालीशी संबंधित शब्द शोधले.

हे शब्द वेद, दर्शनशास्त्र, आयुर्वेद, योग, गणित, कला, ज्योतिष, रसायनशास्त्र, साहित्य, स्थापत्यशास्त्र इत्यादी ४० हून अधिक विषयांशी संबंधित आहेत. एकत्रित सहकार्याने आणि चर्चांमधून प्रत्येक संज्ञेचा अर्थ, संदर्भ व उपयोग यांचा बारकाईने विचार करूनच या शब्दांची निश्चिती करण्यात आली आहे.

कार्यशाळेत सहभागी विशेषज्ञांना विश्वविद्यालयाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अतुल वैद्य यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यशाळेच्या समाप्ती दिवशी वैज्ञानिक तथा तकनिकी शब्दावली आयोगाचे डॉ. शहजाद अन्सारी, डॉ. संजय गायकवाड, रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे आणि विशेषज्ञ, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. वैद्य यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. काणे संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे हे लवकरच आराखडा बनवून देणार आहेत. त्यानंतर विद्यापीठाकडून प्रशासकीय, आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करू. भारतीय ज्ञान परंपरेला विज्ञानाच्या माध्यमातून पुढे आणण्यासाठी विश्वविद्यालय कार्यरत राहील. येणाऱ्या अनेक पिढ्यांना यावेसे वाटेल, शिकावेसे वाटेल. याकरिता उपकेंद्राचे संचालक व सर्व कर्मचाऱ्यांना सदिच्छा देतो.

या वेळी रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे, निरी संस्थेतील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र पाटील, रत्नागिरीतील विविध संस्थांचे व संलग्नित महाविद्यालयांचे पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड


Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply