चित्पावन ब्राह्मण संघाच्या विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

रत्नागिरी : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या ९३व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्ताने विविध पुरस्कारांचे वितरण उत्साहात पार पडले.

मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा समारंभ झाला. प्रारंभी सौ. गीता वसंत फडके यांनी मंगलाचरण म्हणून शंखनाद केला. त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या दरवर्षी होणार्‍या विविध उपक्रमांची तसेच मंडळाच्या नवीन वास्तु उभारणीसंदर्भातील माहिती दिली.
मंडळाच्या ७५ वर्षे पूर्ण झालेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर कोळथरे (ता. दापोली) येथील कै. सौ. सुधा वसंत बडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिल्या जाणार्‍या आदर्श महिला पुरस्कारांचे वितरण झाले. यामध्ये चिपळूणच्या शिक्षण, अभिनय, सूत्रसंचालन, विविध खेळ, स्विमिंग, लेखन, निवेदन, परीक्षण, विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्थांच्या पदाधिकारी असलेल्या प्रा. डॉ. मीनल ओक (चिपळूण), राजापूर येथे १९८०पासून सासूबाईंनी सुरू केलेली स्वस्त व पोटभर जेवण मिळणारी खानावळ व त्यांच्या पश्चात गेली २० वर्षे सासूबाईंचा वारसा पुढे नेणाऱ्या सौ. अर्चना अरुण गाडगीळ, रत्नागिरीच्या नाचणे रोड येथे राहणार्‍या व गेली २२ वर्षे सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त असलेल्या त्यांच्या मुलावर सायंटिस्ट डॉक्टर राजुल वासा (मुंबई) यांची वासा कन्सेप्ट ही उपचारपद्धती अमलात आणणाऱ्या सौ. वैशाली शुभेश पटवर्धन यांना बडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या जूनमध्ये शृंगेरी येथे भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या
सौ. मीरा नाटेकर यांना संस्कृतप्रेमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. वयाच्या ५५व्या वर्षी पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी १५ मिनिटे झुंज देणारे तोंडली-वारेली (ता. चिपळूण) येथील ग्रामस्थ आशीष शरद महाजन, माखजन-संगमेश्वर परिसरातील वीजपुरवठा नियमित करणारे तसेच ऊन, थंडी, पावसातही विद्युत वाहिनीवर येणाऱ्या फांद्या तोडून वीजपुरवठा सुरळित करणारे व जीवावर बेतणाऱ्या प्रसंगातही जिद्दीने व प्रामाणिकपणे काम करणारे परमेश्वर धामणकर यांना स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर शौर्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

समशेरबहाद्दर पुरस्कार शिवणी (सांगली) येथील कॅडेट प्रणय पवार, पन्हाळा (कोल्हापूर) येथील कॅडेट सुयश चव्हाण यांना देण्यात आला. मंडळाच्या कै. ल. वि. केळकर वसतीगृहातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार स्वानंद बर्वे याला व कै. आनंदाबाई त्रिविक्रम केळकर विद्यार्थिनी वसतिगृहातील वेदश्री बापट हिला आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संगमेश्वरचे माजी आमदार, माजी मंत्री रवींद्र माने यांना जीवनगौरव पुरस्कार, चांदेराई येथे रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. श्यामसुंदर मोरे यांना सेवा गौरव पुरस्कार, नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे यांना कार्यगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

नगरसेविका सौ. मानसी करमरकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मेधा कुळकर्णी, चिंचखरी येथील प्रगतिशील शेतकरी हेमंत फाटक, सीए सौरभ लेले, सीए प्रणव दामले, प्रगतिशील शेतकरी, ५० वर्षे दुग्ध व्यवसाय पूर्ण करणारे उंबरवाडी-कोतवडे येथील माधव भावे, शृंगेरी येथे भगवद्गीता पठण स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या पुण्यातील २७ वर्षीय सीए सौ. स्नेहा लिमये यांना विशेष सन्मानित करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेलाही त्यांच्या सातत्यपूर्ण कार्याबद्दल गौरविण्यात आले. मंडळातर्फे लोकमान्य टिळक पारितोषिक, कै. केशव जोशी व कै. सौ. सुलोचना जोशी, प्रकाश देवधर व सौ. आशा देवधर पारितोषिक देऊन विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त केले.

मंडळाचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी मंडळाचे कार्य मनोगतातून सांगितले. मंडळाचे सेक्रेटरी राजेंद्र पटवर्धन यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा साने यांनी केले.

पुरस्कार दिलेल्या व्यक्ती

पुरस्कारप्राप्त मान्यवरांची माहिती –

कै. सुधा बडे पुरस्कार विजेत्या डॉ. मीनल ओक – या पर्यटन विषयात विद्यावाचस्पती पदवीप्राप्त आहेत. पर्यटन व कोकणच्या खाद्यसंस्कृतीवर त्यांनी व्याख्याने दिली असून विविध पर्यटन संस्थांच्या जिल्हाध्यक्ष आहेत. सौ. अर्चना गाडगीळ राजापूरमध्ये खाणावळ व्यवसाय गेली अनेक दशके करत आहेत. सासूबाईंचा समाजसेवेचा वारसा पुढे चालवत आहेत. सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त मुलाचा सांभाळ करून त्याच्यात खूप सुधारणा करणाऱ्या सौ. वैशाली पटवर्धन वैज्ञानिक डॉ. राजूल वासा यांच्या मार्गदर्शनाखाली जे मेंदूबाधित रुग्ण आहेत त्यांच्यासाठी त्या मेहनत घेत आहेत.

संस्कृतप्रेमी मीरा नाटेकर संस्कृत स्तोत्रांचे पठण करून तोंडपाठ करतात. जून २०२५ मध्ये शृंगेरी येथे भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. दुर्गा सप्तशतीचे शेकडो पाठ त्यांनी केले आहेत. २५ वर्षे स्वानंद पठण मंडळात संस्कृत स्तोत्रांचे नैमित्तिक पठण करतात.

चिपळुणातील तोंडली-वरेली सीमेवर राहणारे ५५ वर्षीय आशीष महाजन यांनी पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी बिबट्याशी अदम्य साहस दाखवत झुंज दिली. ऑक्टोबर २०२५ मध्ये ही घटना घडली. माखजन येथील परमेश्वर धामणकर वीजपुरवठा नियमित करणारे दूत आहेत. ऊन, थंडी, पावसातही विद्युत वाहिनीवर येणाऱ्या फांद्या तोडून ते वीजपुरवठा सुरळित करतात. जिवावर बेतणाऱ्या प्रसंगातही जिद्दीने व प्रामाणिकपणे काम करणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.

तासगावच्या गुरुदेव दादोजी कोंडदेव सैनिकी शाळेतील बारावीत शिकणारा प्रणय पवार आणि सुयश चव्हाण हे दोघेही सर्वोत्कृष्ट कॅडेट आहेत. हे दोघेही फुटबॉल, क्रिकेट व खो-खो खेळतात. प्रणयचे आयएएस अधिकारी बनवण्याचे स्वप्न असून सुयशने भारतीय सैन्य दलात अधिकारी होण्याचे ध्येय ठेवले आहे.

जीवनगौरव पुरस्कार विजेते संगमेश्वरचे माजी आमदार रवींद्र माने १९८५ पासून शिवसेनेत तालुकाप्रमुख पदापासून कार्यरत आहेत. तीन वेळा ते संगमेश्वरचे आमदार होते. १९९५ ते ९९ या काळात नियोजन, अर्थ, पाणीपुरवठा व पाटबंधारे राज्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री होते. प्रबोधन शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मीनाताई ठाकरे विद्यालयाची स्थापना, राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, मानेज् इंटरनॅशनल स्कूल सुरू केले.

चांदेराई येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. श्यामसुंदर मोरे यांनी दिवसरात्र, कोणताही सण, सुट्टी न घेता रुग्णसेवेचे व्रत घेतले आहे. विंचूदंश, सर्पदंश झालेल्या रुग्णांना त्वरित उपचार, जागतिक महामारीच्या वेळेस कोरोना योद्धा म्हणून ते कार्यरत राहिले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply