निवडणुकीच्या काळातच का?

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रशासनाला एक प्रकारची जाग आली आहे. मोठ्या दीर्घ निद्रेतून खडबडून जागे व्हावे, अशा पद्धतीने प्रशासनाचे उपक्रम सुरू आहेत. पण निवडणूक प्रक्रिया वगळता अन्य बाबतीत प्रशासन नेहमीच कार्यरत राहिले, तर निवडणुकीच्या काळासाठी म्हणून वेगळे काही करावे लागणार नाही. याची दोन ठळक उदाहरणे देता येतील. एक म्हणजे शाळांची दुरुस्ती आणि दुसरे म्हणजे पोलिसांकडून अवैध दारू आणि हातभट्ट्यांवर होणारी कारवाई.

अधिकाऱ्यांचे शपथपत्र हवे

मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याकरिता ज्या पद्धतीने संकल्पपत्र लिहून घेतले जात आहे, त्याच पद्धतीने शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडूनही तशा आशयाचे पत्र लिहून घेतले गेले पाहिजे आणि ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविले पाहिजे.

प्रशासनाचे अपयश

मतदानाचे स्वातंत्र्य प्रत्येक मतदार उपभोगू शकतो. त्याला योग्य वाटणाऱ्या उमेदवाराला तो मतदान करू शकतो. तशी त्याला मुभा आहे. पण एखादा पक्ष आपल्याच उमेदवाराला मतदान करायला मतदारांना भाग पाडत असेल आणि तसे झाले नाही, म्हणून कुटुंबाला वाळीत टाकत असेल, तर ती केवळ लोकशाहीविरोधी गोष्ट नव्हे तर तो एक गुन्हाच म्हणावा लागेल. शंभर टक्के मतदान व्हावे अशी प्रशासनाची अपेक्षा असेल, तर निवडणुकीच्या काळातच नव्हे, तर नेहमीच सामाजिक वातावरण निकोप राहील, याची खात्रीही प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना मिळणे आवश्यक आहे.

मतदारांची मनधरणी

लोकशाहीमध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य असले तरी व्यक्तिमाहात्म्य श्रेष्ठ ठरत असते. एखाद्याच व्यक्तीला पुढे करून ती व्यक्ती म्हणजे पक्ष, ती व्यक्ती म्हणजे देश असे चित्र निर्माण केले जाते. मतदारांच्या मनात त्या व्यक्तीविषयी, त्या पक्षाविषयी विरोधातील मत असेल, तर पर्यायी योग्य दुसरा पक्ष किंवा दुसरा उमेदवार त्यांच्या नजरेसमोर नसतो. त्यामुळेच त्यांचा गोंधळ उडत असतो. या गोंधळात पडण्यापेक्षा मतदानाकडे पाठ फिरवलेली बरी, असे त्यांना वाटत असते. त्यात बदल व्हायला हवा असेल, तर मतदारांच्या प्रबोधनाबरोबरच त्यांना आश्वासक चित्र निर्माण झाले पाहिजे.

पाणीटंचाईची परंपरा

प्रत्येकाने आपल्या पाण्याची गरज भागवली तर नेते म्हणून त्यांची किंमत कमी होईल ही भीती त्यांना वाटते. म्हणूनच पाण्याच्या टंचाईची रत्नागिरी जिल्ह्याची परंपरा कायम राखण्याकडेच लोकप्रतिनिधी आणि शासनाचाही नेहमीच कल राहतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे नेमेचि उन्हाळा येणार आणि पाणीटंचाई कायम राहणार आहे. पावसाचे पाणी साठविले पाहिजे, हे पालुपद मात्र न चुकता, न विसरता आळविले जाणार आहे. यावर्षीचा उन्हाळा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?

ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नुकत्याच शिपोशीत झालेल्या नवव्या संमेलनातही आले.