रत्नागिरी जिल्ह्याला अनेक वैविध्यपूर्ण परंपरा लाभल्या आहेत. ऐतिहासिक आणि पुरातन मंदिरांमधील अनेक प्रथा, नृत्य, नाट्य, नमन आणि खेळ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे. रेल्वे आणि रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधा निर्माण झाल्या तरी नोकरीचाकरीसाठी मुंबईकडे तरुणांनी धावण्याची परंपरा कायम आहेच, त्याचबरोबर १६ लाखाच्या आसपास असलेली जिल्ह्याची लोकसंख्या कायम टिकविण्याची परंपराही रत्नागिरी जिल्ह्याने जोपासली आहे. याच परंपरेमध्ये आणखी एक परंपरा जिल्ह्यात निर्माण झाली आहे, ती दरवर्षीच्या पाण्याच्या टंचाईची. दरवर्षी ठरावीक वेळी गणेशोत्सव साजरा होतो, शिमगोत्सव थाटामाटा साजरा केला जातो, त्याच पद्धतीने पाणीटंचाईही एक प्रकारे साजरी केली जाते. अन्य परंपरा जिल्ह्यातील लोक साजरे करतात, तर पाणीटंचाईची परंपरा शासकीय पातळीवर साजरी होते. रत्नागिरी शहर पोलिसांतर्फे नारळी पौर्णिमेला लोकांच्या बरोबरीने परंपरेने जसा समुद्राला नारळ अर्पण केला जातो, त्याच पद्धतीने जिल्ह्यात दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचा उत्सवही शासकीय पातळीवर साजरा केला जातो.
जिल्ह्यातील पाण्याची टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. घरांची जागा इमारतीने घेणे, जंगलतोडीमुळे वनाच्छादित क्षेत्रात घट होणे अशी अनेक कारणे त्याला आहेत. प्रमाणापेक्षा अधिक पाण्याचा उपसा आणि जलपुनर्भरणाचा अभाव हेसुद्धा त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे. नवीन वर्ष सुरू झाले की जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या आराखड्यांच्या दृष्टीने हालचाली सुरू होतात. शासकीय उपक्रम म्हणून ठिकठिकाणी बंधारे बांधले जातात. धरणे उभारली जातात. नळ पाणीपुरवठा योजना राबविल्या जातात. तरीही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जिल्ह्याला जाणवते. या टंचाईचे आराखडे तयार करताना खासगी आणि सरकारी टँकर, त्याकरिता लागणारे डिझेल, चालक आणि अन्य कर्मचाऱ्यांचे वेतन इत्यादींसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचे नियोजन केले जाते. दरवर्षी टँकरने पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी करणाऱ्या गावांच्या संख्येमध्ये मात्र फारसा बदल होत नाही. पाणी पुरविण्यासाठी होणाऱ्या खर्चाबरोबरच पाणी साठविण्यासाठी तरतूद झाली पाहिजे. टंचाई आराखड्याबरोबरच पाणीसाठवण आराखडाही तयार व्हायला हवा.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात दरवर्षी सर्वाधिक टंचाई जाणवते, तर इतर तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात टंचाई भासत असते. वनीकरणाबरोबरच पावसाचे पाणी साठविण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे हा खरे तर पाणीटंचाईवरचा महत्त्वाचा उपाय आहे. पण त्या दृष्टीने कोणत्याही शासकीय योजना राबविल्या जात नाहीत. गावांचे अलीकडे मोठ्या प्रमाणावर शहरीकरण झाले आहे. कच्च्या घरांच्या जागी पक्की घरे आणि इमारतींचे प्रमाण वाढले आहे. त्याकरिता मोठ्या प्रमाणावर पाण्याची मागणी होत असते. आधुनिक पद्धतीची घरे बांधताना प्रत्येक घराने स्वतःच्या घरापुरती पाणी साठवण्याची योजना राबविली, तरी टंचाईचे प्रमाण कमी व्हायला मदत होईल. त्या दृष्टीने व्यवस्था करावी, तरतूद करावी, पाणी साठवण्याकरिता लोकांना प्रवृत्त करावे, असे शासकीय यंत्रणेला सुचत नाही आणि लोकप्रतिनिधींच्या गावीही ही कल्पना असू शकत नाही. कारण टँकरची मागणी ज्या प्रमाणात वाढेल, त्या प्रमाणात त्यांची लोकसेवेची प्रतिमा उजळून निघत असते. प्रत्येकाने आपल्या पाण्याची गरज भागवली तर नेते म्हणून त्यांची किंमत कमी होईल ही भीती त्यांना वाटते. म्हणूनच पाण्याच्या टंचाईची रत्नागिरी जिल्ह्याची परंपरा कायम राखण्याकडेच लोकप्रतिनिधी आणि शासनाचाही नेहमीच कल राहतो. नेमेचि येणाऱ्या पावसाळ्याप्रमाणे नेमेचि उन्हाळा येणार आणि पाणीटंचाई कायम राहणार आहे. पावसाचे पाणी साठविले पाहिजे, हे पालुपद मात्र न चुकता, न विसरता आळविले जाणार आहे. या वर्षीचा उन्हाळा तरी त्याला अपवाद कसा ठरेल?
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, १५ मार्च २०२४)
(साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

