विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा जीवनात उपयोग करावा : डॉ. साखळकर

रत्नागिरी : विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात करण्यावर भर द्यावा, असे आवाहन येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, संज्ञानात्मक, सर्जनशील आणि सामाजिक कौशल्यांचा विकास करण्यावर भर देण्यात आला आहे. अनुभवात्मक विचार, आंतरशाखीय दृष्टिकोन यावर भर देऊन विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि तार्किक विचार वृद्धिंगत व्हावेत, तसेच विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराभिमुख बनवावे, या उद्देशाने महाविद्यालयाने अर्थशास्त्र विभागामार्फत अर्थशास्त्रीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर डॉ. साखळकर बोलत होते. त्यांनी विभागाचे आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी ग्रामविकास आणि स्वयंरोजगारसाठी असणाऱ्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोविण्याचा प्रयत्न करावा. ग्रामीण भागातील युवकांनी अर्थशास्त्रीय प्रतिमाने उपयोगात आणून रोजगार देणारे व्हावे. विद्यार्थ्यांचा प्रदर्शनातील सहभाग आणि विविध मॉडेल सादरीकरणाचा आत्मविश्वास त्यांच्या भावी जीवनात उपयोगी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अर्थशास्त्र विषयातील संकल्पना अनेकांना क्लिष्ट वाटतात, परंतु या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी तयार केलेली पोस्टर व मॉडेल्सद्वारे अर्थशास्त्र हा विषय समजण्यास सुलभ केला. प्रदर्शन सादरीकरणात सहभागी विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्र विषयाच्या अनेक संकल्पनांचे सोप्या भाषेत विवेचन केले. पोस्टर, मॉडेल, रांगोळी, चित्रे व आकृत्या या माध्यमातून आपली सदरीकरण कौशल्ये अधिक विकसित केली.

वित्तीय साक्षरता, केंद्रीय अर्थसंकल्प, महागाई, बेरोजगारी आणि दारिद्र्य, रिफायनरी, प्रदूषण आणि शाश्वत ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण ग्राम अर्थव्यवस्था, कृषी आणि ग्रामीण पर्यटन, स्मार्ट सिटी, सेंद्रिय शेती, कृषी आणि ग्राम पर्यटन, कृषीपूरक व्यवसाय, अर्थशास्त्रातील करियर संधी अशा विविध विषयांवर विद्यार्थांनी पोस्टर आणि मॉडेल सादर केली. हे नावीन्यपूर्ण अर्थशास्त्रीय प्रदर्शन पाहण्याचा लाभ महाविद्यालयातील तसेच इतर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी घेतला.

उपक्रमातील सर्व विद्यार्थी, विभागप्रमुख डॉ. रामा सरतापे, सहकारी प्राध्यापक प्रा. एस. एम. पोटे, डॉ. दिनेश माश्रणकर, प्रा. सूर्यकांत माने यांच्या सहकार्यातून हा उपक्रम पार पडला. अर्थशास्त्रीय पोस्टर व मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी केले. उद्घाटनप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे, हिंदी विभागप्रमुख डॉ. शाहू मधाळे, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. वासुदेव आठल्ये, प्रा. सचिन सनगरे, प्रा. कृष्णात खांडेकर उपस्थित होते. प्रदर्शन पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया फलकावर नोंदविल्या.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply