रत्नागिरी : केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या अंगीकृत राष्ट्रीय सहकार विकास निगमने उत्कृष्ट कामकाजासाठी रत्नागिरीतील स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेला. गुणवत्ता पुरस्कार देऊन गौरविले.
पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात ८ संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हे महामंडळ दर दोन वर्षांनी उत्कृष्ट कार्याची दखल घेत पुरस्कार प्रदान करत असते. वैकुंठभाई मेहेता प्रशिक्षण संस्थेच्या केंद्रीय संचालक डॉ. हेमा यादव, अतिरिक्त आयुक्त श्री. वडेकर, श्री. मेनन यांच्या हस्ते स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. वीस हजाराचा धनादेश, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, व्यवस्थापक मोहन बापट, उपव्यवस्थापक हेमंत रेडीज, ज्येष्ठ अधिकारी विशाल सावंत आणि अन्य कर्मचारी यांनी पुरस्कार स्वीकारला.
छाया यादव यांनी सन्मानपात्र संस्थांचे अभिनंदन केले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून जनतेच्या शक्तीला एकवटून प्रभावी काम करण्याची संधी उपलब्ध आहे. ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत प्रभावी रचनात्मक काम उभारत सहकारी संस्था विकासामध्ये मोठे योगदान करत आहे. त्यातील उत्तम काम करणाऱ्या संस्थांचा हा गौरव आहे. यातून अन्य संस्था प्रेरणा घेतील, असे डॉ. यादव म्हणाल्या.
स्वरूपानंद पतसंस्था सातत्यपूर्ण उत्तम काम करत आहे. विश्वासार्ह आर्थिक संस्था म्हणून जनमानसात पतसंस्था प्रसिद्ध आहे. आता केंद्र शासनाच्या महामंडळाने या उत्कृष्ट कामावर गुणवत्ता पुरस्कार देऊन आपली मोहोर उमटवली आहे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष श्री. पटवर्धन यांनी व्यक्त केली. केंद्र शासनाशी संबंधित हा पुरस्कार संस्थेच्या सर्व ४५ हजार सभासदांना समर्पित करत असल्याचे भावोद्गार त्यांनी काढले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

