ध्यास : गाव जगवण्याचा, जागवण्याचा

राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे नववे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन लांजा तालुक्यातील शिपोशी या गावी मोठ्या अभूतपूर्व उत्साहात साजरे झाले. संमेलनाला अनेक आयाम लाभले होते. जुन्या आणि चांगल्या प्रथा-परंपरांचे जतन करणे, सध्याच्या काळात चांगले काम करणाऱ्यांना शाबासकी देणे आणि उद्याच्या पिढीसाठी उत्तम विचारांचे बीजारोपण करणे हे उद्दिष्ट राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने गेल्या आठ ग्रामीण साहित्य संमेलनांपासून ब्रीद म्हणूनच अंगीकारले आहे. त्याचे प्रत्यंतर नवव्या संमेलनातही आले. संपूर्ण संमेलन संघाचे अध्यक्ष सुभाष लाड यांच्याभोवतीच फिरत होते. एकच व्यक्ती किती ऊर्जावान असू शकते, याचेही ते मूर्तिमंत उदाहरण होते. तरुणांना लाजवेल असा उत्साह आणि ज्येष्ठ नागरिकांच्या मनातील वृद्धत्वाची, जीर्णत्वाची, तरुण पिढीपासून फेकले गेल्याची भावना आणि मनाला आलेली मरगळ झटकून टाकायला लावणारी त्यांची लगबग संमेलनात सहभागी झालेल्या प्रत्येकाला जाणवत होती. संमेलन यशस्वी होण्याचे ते एक सर्वांत महत्त्वाचे कारण होते आणि अर्थातच ते सर्वांनाच प्रेरणादायी होते. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने विविध पुरस्कार संघामार्फत दिले जातात. त्यावर नजर फिरविली, तरी हे अधिक स्पष्ट होईल. साने गुरुजी, प्रा. मधू दंडवते, बॅ. नाथ पै अशा आपल्या भागात होऊन गेलेल्या महानीय व्यक्तींच्या स्मृती जागविण्याबरोबरच नारायण तावडे, नाटककार ला. कृ. आयरे अशा स्थानिक व्यक्तींचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या नावानेही पुरस्कार दिले जातात. सावित्रीबाई फुले, अक्षरमित्र, माऊली, आदर्श गृहिणी, उद्यमश्री, संस्था कार्यकर्ता अशा विविध पुरस्कारांसाठी ज्या व्यक्तींची निवड केली जाते, त्या व्यक्ती विविध क्षेत्रात कार्यरत असतात. संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या राजापूर आणि लांजा तालुक्यातील व्यक्तींनाच ते पुरस्कार दिले जातात, भले ते मुंबईत जाऊन मोठे झाले असले तरी त्यांची गावाशी असलेली नाळ लक्षात घेऊन त्यांचा सन्मान केला जातो. आपल्या मातीतल्या माणसांना आम्हीच मोठे करणार या विचारानेच संस्था कार्य करत आहे.

पूर्वी कोकणातील ग्रामविकास मंडळे प्रामुख्याने रस्ता, एसटी, शाळा आणि देऊळ अशा चौकोनी विकासकामांमध्ये कार्य करत असत. त्या काळात ते आवश्यकही होते. पण नंतरच्या काळात त्या सर्व सोयीसुविधा गावात उपलब्ध झाल्यानंतर मंडळांनी सार्वजनिक पूजा आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम यापलीकडे फारसे काही केल्याचे दिसत नाही. त्या पार्श्वभूमीवर राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे कार्य नजरेत भरणारे आहे. गावे ओस पडू लागली आहेत. त्यांच्यासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, असे व्यासपीठावरील वक्तव्य न करता तसेच सरकारने काहीतरी केले पाहिजे, अशी मागणी न करता वामनराव पै यांच्या वचनानुसार तूच आहेस तुझा तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे गावातील लोकांना जाणीवपूर्वक पटवून देण्याचे काम हा संघ करत आहे. त्यामुळे राजापूर आणि लांजा या दोन तालुक्यांमधील आतापर्यंत ज्या नऊ गावांमध्ये साहित्य संमेलने झाली, त्यातून त्या त्या गावांमध्ये जागृती निर्माण झाली. आपण गावातच राहून काहीतरी केले पाहिजे, मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जाऊन नोकरीचाकरी करण्यापेक्षा गावातील शेतीभाती, दूधदुभते आणि स्थानिक रोजगार याकडे लक्ष दिले तर आपली घरेही जागती राहतील, अशीच जाणीव निर्माण करण्याचे पद्धतशीर काम संघाने चालविले आहे. ग्रामीण साहित्य संमेलनांच्या निमित्ताने जागृत झालेले असंख्य कार्यकर्ते संघाशी नव्याने जोडले जात आहेत. गावामध्ये जागृती आणण्याचा आणि स्थानिक स्वरूपातच रोजगार-व्यवसाय, नोकरी करण्यासाठी स्थानिक लोकांना प्रवृत्त करून गावे जगविण्याचाही ध्यास संघाने जणू घेतला आहे. यापुढेही संघ ते काम करत राहणार आहे. त्याला सातत्याने यश यावे, याच सदिच्छा.

  • प्रमोद कोनकर
    (संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ मार्च २०२४)

    (साप्ताहिक कोकण मीडियाचे अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply