कोकणात व्यावसायिक शेती करू इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना व्यावसायिक शेतीसाठी मोफत मार्गदर्शन

देवरूख : करोनाच्या काळात मुंबई-पुणे येथून कोकणात आलेल्या तरुणांनी कोकणात व्यावसायिक शेतीचा प्रयोग करावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीने केले आहे. त्यांना मोफत व्यावसायिक शेतीविषयक सल्ला देण्याची तयारी या समितीने दर्शविली आहे.

करोनाच्य काळात कोकणात जे तरुण मुंबई-पुण्यातून आले आहेत आणि ज्यांनी क्वारंटाइनचा काळ पूर्ण केला आहे, अशा तरुणांनी शहरात परत जायला वेळ असेल, तर आपापल्या गावी व्यावसायिक शेती आणि इतर पूरक व्यवसायात लक्ष घालावे. कुटुंबासह आपल्या भागाच्या आर्थिक विकासात पुढाकार घ्यावा, असे आवाहन गाव विकास समितीचे संघटनप्रमुख सुहास खंडागळे यांनी केले आहे. सरकार लॉकडाऊन पूर्णतः उठवेल, नंतर आपण पुन्हा शहरात जाऊ, अशी वाट न पाहता आता लॉकडाऊनमध्ये ज्या सवलती मिळाल्या आहेत, त्यांचा उपयोग करून कोकणातील तरुणांनी कृषी व्यवसायात लक्ष घालावे. आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. शहरात जायला वेळ असेल, तेथे जाऊन नोकरीबाबत ज्यांना अनेक प्रश्न निर्माण झाले असतील, अशा तरुणांनी गावी आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये व्यावसायिक शेतीसाठी पुढाकार घेऊन लागवड करावी. अनेक चाकरमानी होळीला गावी आले होते. ते आजही गावी आहेत. अशा लोकांनी शेतीकडे लक्ष दिले, तर गावांची प्रगती होण्यास वेळ लागणार नाही. पावसाळा जवळ आला असून शेतीबाबतचे नियोजन वेळीच केल्यास त्याचा फायदा नक्की होईल, असा विश्वास श्री. खंडागळे यांनी व्यक्त केला आहे.

कोकणात आर्थिक सुबत्ता येण्यासाठी येथे व्यावसायिक शेतीला चालना मिळणे आवश्यक असून ज्या प्रयोगशील तरुणांना शेतीचा व्यवसाय करायचा आहे, त्यांना गाव विकास समितीचे कृषी तज्ज्ञ राहुल यादव यांच्यामार्फत फोनवरून मोफत व्यावसायिक शेतीचा सल्ला देण्यात येणार असल्याचेही श्री. खंडागळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी 9689163748 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

2 comments

  1. सौ, माधुरी श्रीधर पंडित, कल्याण, जिल्हा ठाणे says:

    नमस्कार, कोकण मीडिया हे मासिक,मला खूप आवडतं, कारण हे माझ्या जवळच आहे ,कोकणाशी निगडित सर्व माहिती घर बसल्या वाचायला मिळते,रत्नागिरी, सिधुदुर्ग,जिल्हा, तेथील, सर्व प्रकारची,सामाजिक आध्यात्मिक माहिती, तसंच सर्व प्रकारचे उत्सव, इथूनच आपण,एन्जॉय करतो, आता krona संबंधित माहिती पण मिळते आहे ,लोक शेतीकडे वळले तर खूपच समाधानाची गोष्ट असेल

Leave a Reply