करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरस्कार

रत्नागिरी :  करोना लढ्यातील उत्कृष्ट कामासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांना २५ हजार ते दोन लाखापर्यंतचे सन्मान पुरस्कार रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहेत. अशा तऱ्हेने पुरस्कार जाहीर करणारा रत्नागिरी हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात बाहेरून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी येत असून, ग्रामीण आणि शहर भागात या चाकरमान्यांची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने नागरी आणि ग्रामीण कृती दलांवर सोपविली आहे. चाकरमान्यांसाठी नियम ठरविण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी कृती दलाने करावयाची आहे. त्याप्रमाणे जिल्ह्यात अनेक भागात कृती दले काम करीत आहेत. या कृतीदलांच्या कार्याचा उचित गौरव व्हावा, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या गाव, वाडी, नागरी कृती दलाचा करोना गौरव सन्मान करण्याची योजना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केली आहे.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कृती दलांच्या मूल्यमापनासाठी विविध कमिट्या नेमण्यात आल्या असून, ते या सर्वांमधून विजेत्या कृती दलाची निवड करणार आहेत. जिल्ह्यातील एका स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड दोन लाखाच्या जिल्हास्तरीय सन्मानासाठी केली जाणार असून, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो सन्मान दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांसाठी प्रत्येकी  तीन पुरस्कार दिले जाणार आहेत. एक लाख रुपये ५० हजार रुपये आणि २५ हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती आणि नगरपालिकांनी येत्या १५ जूनपर्यंत सन्मानासाठी अर्ज करावयाचा असून, तालुका पातळीवरचा निकाल २३ जून रोजी, तर जिल्हा पातळीवरचा निकाल ३० जून रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहीर केले आहे.
(जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply