रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांमध्ये पुन्हा २० जणांची वाढ

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९ जून) सायंकाळपर्यंतच्या २४ तासांत करोनाबाधितांच्या संख्येत आणखी २० जणांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५८० झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवा एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यातील कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथून ३, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथून १, जिल्हा रुग्णालय १ आणि पेढांबे येथून २ अशा एकूण ७ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४३७ झाली आहे.

काल सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार नव्याने सापडलेल्या 20 रुग्णांचा तपशील असा – शिरगाव, ता. रत्नागिरी- ३, जेल रोड, रत्नागिरी- २, मालगुंड, ता. रत्नागिरी – १, गावडेआंबेरे, ता. रत्नागिरी- १, राजिवडा, ता. रत्नागिरी- १, घरडा कॉलनी, लवेल, ता. खेड- ६, कुंभारवाडा, ता. खेड- १, पायरवाडी, कापसाळ, ता. चिपळूण- २, पेठमाप, चिपळूण- १, गोवळकोट, ता. चिपळूण- १, जुनी कोळकेवाडी, ता. चिपळूण- १. सध्या रुग्णालयात असलेल्या ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ११९ आहे. त्यात पुन्हा दाखल केलेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.

आज रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉप, उद्यमनगर, मारुती मंदिर, चर्मालय, रत्नागिरी, भाट्ये, ता. रत्नागिरी, तिवंदेवाडी, शिरगाव, ता. रत्नागिरी, बौद्धवाडी, मिरजोळे, ता. रत्नागिरी ही सात क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तसेच नर्सिंग हॉस्टेल, गोगटे कॉलेज ग्राऊंडशेजारी, झाडगाव नाका, साखरतर, मेर्वी, धामणसे, नरबे, लाजूळ, देवूड, उक्षी, नाणीज, भंडारपुळे, करबुडे कोंड, कशेळी, राजिवडा, नाचणे शांतीनगर, गणेशगुळे, ता. जि. रत्नागिरी या भागात करोना विषाणूबाधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या कन्टेनमेंट झोनचा कालावधी पूर्ण झाल्यने त्या भागाच्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या.

परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यांतून रत्नागिरी जिल्ह्यात काल सायंकाळपर्यंत आलेल्या चाकरमान्यांची संख्या एक लाख ५९ हजार ७३१ झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या ८४ हजार ८०३ आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज करोनाचा नवा रुग्ण आढळला नाही. जिल्ह्यातील एकूण २१३ करोनाबाधित रुग्णांपैकी १५२ व्यक्तींना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे, तर चार रुग्णांचा मृत्यू झाला असून एक रुग्ण मुंबईत उपचारांसाठी गेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या करोनाच्या ५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा रुग्णालयातर्फे एकूण ३ हजार ६६९ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ३ हजार ५९९ नमुन्यांचा अहवाल मिळाला. त्यामध्ये २१३ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ३ हजार ३८६ व्यक्तींचे नमुने निगेटिव्ह आहेत. आणखी ७० नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. विलगीकरणात सध्या एकूण ८५ व्यक्ती दाखल आहेत. डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये असलेल्या ६८ रुग्णांपैकी ३९ पॉझिटिव्ह तर २९ संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ९, तर कोविड केअर सेंटरमध्ये ८ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत.

परजिल्ह्यातून, राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये २ मे २०२० रोजी पासून आजअखेर एक लाख १६ हजार ६७३ चाकरमानी दाखल झाले आहेत.
…..

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply