वाढीव वीजबिलासंबंधी ३० जूनला रत्नागिरीत विशेष ग्राहक मेळावा

रत्नागिरी : मार्च, एप्रिल व मे या लॉकडाउन कालावधीमध्ये ग्राहकांचे मीटर रीडिंग झाले नसल्यामुळे जून महिन्यात वीजबिले जास्त आली आहेत. वीजबिलांसंबंधी वीज ग्राहकांच्या असलेल्या तक्रारी पाहता उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी (३० जून) रत्नागिरी येथे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात विशेष ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी ग्राहकांच्या वीजबिल तक्रारींचे निरसन करणार असून, जास्तीत जास्त ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या आदेशानुसार, करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणने लॉकडाउन कालावधीत वीज मीटरचे रीडिंग घेणे, बिलाची छपाई करणे व त्याचे वितरण करणे ही कामे थांबविली होती. परिणामी अडीच ते तीन महिन्यांनी रीडिंग झाल्याने ग्राहकांना जून महिन्यात चालू रीडिंगनुसार आलेली बिले वरकरणी जास्त आलेली दिसतात. त्यांच्या या बिलांबाबत काही तक्रारी आहेत. ही बिले तपासून पाहण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/consumerbill ही लिंक सर्व ग्राहकांना मोबाइल संदेशाच्या माध्यमातून दिली आहे. तसेच ती वीजबिलावरही उपलब्ध आहे. अनेकांनी या लिंकद्वारे आपले वीजबिल तपासून भरले आहे. तरीही ज्या ग्राहकांना वीजबिल तक्रारीचे समक्ष निराकरण करायचे आहे, त्यांनी रत्नागिरी येथे मंगळवारी (३० जून) सकाळी १० वाजता होणाऱ्या विशेष ग्राहक मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

या मेळाव्याला मंत्री उदय सामंत, महावितरणचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले व इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करणार आहेत.

लॉकडाउन कालावधीमध्ये मीटर रीडिंग न घेतल्यामुळे अथवा अन्य कोणत्याही कारणामुळे चुकीचे बिल आले असल्यास तत्काळ दुरुस्ती करून मिळणार आहे. याकरिता रत्नागिरी ग्रामीण परिसरातील ग्राहकांसाठी दोन हेल्पडेस्क आणि रत्नागिरी शहर परिसरातील वीज ग्राहकांसाठी चार हेल्पडेस्कची व्यवस्था केली आहे. करोनासंबंधीचे निर्बंध पाळून व सोशल डिस्टन्सिंग राखून मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरण कंपनीने केले आहे.

मेळाव्याचे ठिकाण : स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी
दिनांक व वेळ : मंगळवार (३० जून), सकाळी १० वाजता
………..

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply