मालवणमध्ये ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याची सुरुवात

मालवण : मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण आणि साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने कथामाला, सेवांगण आणि कोमसाप या ग्रुपवर ऑनलाइन विज्ञानकथा पंधरवड्याचा नुकताच शुभारंभ झाला. बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांनी आल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाची कथा प्रभावी कथनशैलीत सादर करून या उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत सिंधुदुर्गाबरोबरच राज्यभरातील मुलांसाठी दररोज एक विज्ञानकथा सादर केली जाणार आहे.

ते म्हणाले, ‘आल्फ्रेड नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला; मात्र त्या शोधाचा दुरुपयोग झाला. यामुळे त्यांना अतीव दु:ख झाले. ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे वाटल्यावर आपल्या अफाट संपत्तीचा ट्रस्ट करून सर्वोच्च मानाचा नोबेल पुरस्कार आल्फ्रेड नोबेल यांनी सुरू केला. शांतता, साहित्य, भौतिक, रसायन, अर्थशास्त्र या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी तो दिला जातो.’

उद्घाटनप्रसंगी साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष सुरेश ठाकूर म्हणाले, ‘हे युग विज्ञानाचे युग आहे. आज २१व्या शतकातील मुले हे आपल्या समोरचे लक्ष्य आहे. आज खेळणी, करमणूक, उद्योग, प्रवास, खाणे-पिणे, कपडे, आरोग्य, शिक्षण आदी अनेक क्षेत्रे विज्ञानाने व्यापली आहेत. आजचे बालक जन्मल्यापासून मोबाइल, इंटरनेट, वाय-फाय यांच्या सान्निध्यात असते. साहजिकच अनेक प्रश्न त्या मुलांना पडतात. हे कोणी बनविले, याचा शोध कोणी लावला, तो लावत असताना काय काय अडचणी आल्या असतील, असे अनेक प्रश्न त्यांना पडतात. त्यांची उत्तरे त्या मुलांना हवी आहेत. त्यासाठी आम्ही ‘शास्त्रज्ञांच्या शोधाच्या कथा’ ही नवी कथामालिका सुरू करण्यात आली आहे.’

सिंधुदुर्गाबरोबरच महाराष्ट्रातील मुलांसाठी दररोज एक विज्ञानकथा सादर होणार आहे. त्यात साने गुरुजी कथामालेचे पुढील कथानिवेदक सहभागी झाले आहेत. त्यांच्या नावापुढे दिलेल्या शास्त्रज्ञाच्या शोधांची गोष्ट ते निवेदक सांगणार आहेत. शीतल पोकळे (डॉ. जगदीशचंद्र बोस), तेजल ताम्हणकर (मायकल फॅरेडे), प्रसन्ना पानसे (कमला सोहनी), गुरुनाथ ताम्हणकर (डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या), अनघा नेरूरकर (आर्यभट्ट), सुगंधा गुरव (प्रफुल्लचंद्र राय), उज्ज्वला धानजी (अल्बर्ट आइनस्टाइन), ऋतुजा केळकर (हेन्री फोर्ड), शिवराज सावंत (डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम), सदानंद कांबळी (चंद्रशेखर व्यंकटरमण), कल्पना मलये (मेरी क्यूरी), रश्मी आंगणे (अॅलन ट्युरिंग), सुजाता टिकले (व्ही. एन. शिरोडकर), सरिता पवार (मीनल भोसले), स्वराशा कासले (डॉ. पी. के. सेठी), श्रद्धा वाळके (रामानुजन), सुरेश ठाकूर (जोहान्स गटेनबर्ग).

‘हा उपक्रम शिक्षण विभागासाठीही महत्त्वपूर्ण असल्याने या कथा माझ्या शिक्षण विभागामार्फत शाळाशाळांपर्यंत पोहोचविल्या जातील,’ असे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले. या उपक्रमामुळे एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे.
……..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply