सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय तीन महिन्यांत; रत्नागिरीत लवकरच : उदय सामंत

रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत सुरू होईल, तर रत्नागिरीत महाविद्यालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री उदय सामंत यांनी आज (तीन जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

सामंत यांनी मुंबईत आज यासंदर्भात झालेल्या विविध बैठकांविषयीची माहिती दिली. ते म्हणाले, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, वैद्यकीय शिक्षणक संचालक डॉ. तात्या लहाने, वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसचिव यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतील वैद्यकीय महाविद्यालयांबाबत चर्चा झाली. सिंदुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने बृहत् आराखड्यानुसार केंद्र सरकारने तेथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला परवानगी दिली आहे. महाविद्यालयासाठी आवश्यक असलेली २५ एकर जागा सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणाकडे आहे. ती वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर महिला रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या क्षेत्रात १५० जागांचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल. महाविद्यालयातील पदांबाबतची चर्चा होऊन येत्या दोन ते तीन महिन्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी मिळेल.

रत्नागिरी जिल्हा बृहत् आराखड्यात नसल्याने रत्नागिरीला खास बाब म्हणून वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण संचालकांना पाठवावा, असे सूचित करण्यात आले आहे, असे सामंत यांनी सांगितले. राज्य शासनही खास बाब म्हणून वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करू शकते, असे डॉ. लहाने यांनी सांगितल्याचे सामंत म्हणाले. त्यानुसार रत्नागिरी शहरात २५ एकर जागा घेऊन महिन्याभरात तसा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण सचिवाांकडे पाठवायचा निर्णय आज झाला. जागेची गरज पूर्ण केली, तर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात महाविद्यालय सुरू करणे शक्य असल्याचा अहवाल त्याबाबत रत्नागिरीत नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने शासनाला सादर केला आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालय आणि मनोरुग्णालय, तसेच महिला रुग्णालयाच्या क्षेत्रात मिळून वैद्यकीय महाविद्यालय सुरू होऊ शकेल, असे सामंत यांनी सांगितले.
…….

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

One comment

Leave a Reply