रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता. २) सायंकाळपासून मिळालेल्या अहवालांनुसार आणखी २२ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता ६८३ झाली आहे. दरम्यान, सिंधुदुर्गातील बाधितांची संख्या २२९ आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
आज (तीन जुलै) रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातून ११ रुग्णांना बरे वाटल्याने घरी सोडण्यात आल्याने करोनामुक्त झालेल्यांची संख्या ४६० झाली आहे. सध्या जिल्ह्यात विविध रुग्णालयांमध्ये १९७ रुग्ण उपचार घेत आहेत.
आज एसपी बंगला, रत्नागिरी, खेडशी, गणेशगुळे, वेळवंड ही चार क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. पूर, बामणोली, मानसकाकोंड, धामापूरतर्फे संगमेश्वर, मुरडव (ता. संगमेश्वर) येथील करोना विषाणूबाधित क्षेत्रेही करोनामुक्त झाली असून, त्यांच्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
आज सायंकाळची जिल्ह्याची करोनाविषयक स्थिती अशी – एकूण बाधित – ६८३, बरे झालेले – ४६०, मृत्यू – २६, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – १९७.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्गातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या २२९ असून, १५४ जणांना बरे वाटल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. सध्या ६९ रुग्णांवर उपचार सुरू असून, पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून, ते लॉकडाउन दिनांक आठ जुलै २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंतच असेल, असे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या लॉकडाउनच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय आस्थापना या पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामध्ये औषध दुकानांचाही समावेश आहे. तसेच जिल्ह्यातील करोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने जिल्हावासीयांच्या भल्यासाठीच हे लॉकडाउन केले आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे योग्य ते पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
…..
