रत्नागिरी : मुंबईतून गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची शासनाकडून पुरेशी काळजी घेतली जाणार असून गणेशोत्सवाबाबत लवकरच स्थानिक समित्यांद्वारे निर्णय घेतला जाईल, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
मुंबईतील लालबागचा राजा, सीकेपी आदी उत्सव मंडळांचा आदर्श ठेवून रत्नागिरीचा राजा सार्वजनिक उत्सव रद्द करण्यात आल्याचे सांगून श्री. सामंत म्हणाले की, उत्सवाच्या काळात ११ दिवस करोनामुक्त झालेल्या रुग्णांकडून प्लाझ्मा संकलनाचे प्रयत्न केले जाणार असून करोनाविषयक अन्य मदतही केली जाणार आहे. याशिवाय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आणि घरगुती उत्सवाबाबत नियमावली ठरविण्याचे काम केले जाईल. पोलीस अधीक्षक या समितीचे उपाध्यक्ष, तर निवासी उपजिल्हाधिकारी सचिव असतील. प्रत्येक तालुक्यातील घरगुती गणेशोत्सवाचा एक, तर सार्वजनिक उत्सवांचे पाच प्रतिनिधी या समितीमध्ये असतील. ते घरोघरच्या आरत्या वगैरेंबाबतची नियमावली तयार करतील. सिंधुदुर्गात १६, तर रत्नागिरी जिल्ह्यात १७ णांची समिती असेल. करोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे साडेतीन लाख, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अडीच लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. त्यामुळे आता गणेशोत्सवासाठी येणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने कमी असेल. तरीही कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची काळजी शासन घेईल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गासंबंधातील बैठक येत्या २-३ दिवसांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होईल. उत्सवासाठी महामार्गावरील टोल रद्द करावा, ही मागणी पुढे आली आहे. ई-पासेस देण्याची व्यवस्था सुरळीत व्हावी, अशीही मागणी झाली आहे. त्याबाबत विचार होईल. चाकरमान्यांना प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असेही ते म्हणाले.
…..
Covid-19 test karavi lagel ka gavi jatana.
Passes banvave lagtil ka