रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : भारतीय तटरक्षक दल-रत्नागिरी, मत्स्य व्यवसाय विभाग-सिंधुदुर्ग आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारांना सागरी सुरक्षेच्या दृष्टीने घावयाच्या काळजीबाबतची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली.
मच्छिमारांना नेहमी समुद्रामध्ये वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. कधी वादळ, कधी बोट मध्येच बंद होणे, बोटीचे अपघात होणे अशा घटना समुद्रामध्ये होत असतात. अशा वेळी मच्छिमार खूप संकटात सापडत असतो. त्यामुळे अशा संकटावेळी त्यांनी काय करायला हवे, कोणाशी तात्काळ संपर्क साधायला हवा याची माहिती ऑडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्यात आली. मच्छिमारांना तज्ज्ञ व्यक्तींनी घरबसल्या ही माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये भारतीय तटरक्षक दलाचे रत्नागिरीतील ऑपरेशन ऑफिसर नरेश कुमार मुख्य तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी मच्छिमारांना समुद्रामध्ये जाताना घ्यावयाची काळजी, आपत्कालीन परस्थितीमध्ये मच्छिमारांनी कोस्ट गार्डशी संपर्क कसा साधावा, समुद्रामध्ये संशयास्पद बोटी किंवा हालचाल दिसल्यास काय करावे, समुद्रामध्ये बोटीला अपघात झाला किंवा बोट बिघडली तर संपर्क कसा साधावा आणि इतर बोटींना इशारा कसा द्यावा याची माहिती दिली.
सिंधुदुर्ग मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रभारी सहायक मत्स्य आयुक्त नागनाथ भादुले यांनी मासेमारांना किसान क्रेडिट कार्डबद्दल माहिती दिली. यासाठी अर्ज कसा करावा, कर्जाची मुदत, व्याजदर, पात्रता याची संपूर्ण माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे नियोजन देवगड येथील तारामुंबरी मासेमार सहकारी सोसायटीचे व्यवस्थापक अरुण तोरसकर यांनी केले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, तेजस डोंगरीकर व गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण व वेंगुर्ला तालुक्यातील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शेतकरी-मच्छिमारांसाठी निःशुल्क हेल्पलाइन
सागरी हवामान, शासकीय योजना व शेती, पशुपालन आणि इतर माहितीसाठी रिलायन्स फाउंडेशनच्या १८००४१९८८०० या निःशुल्क क्रमांकावर सोमवार ते शनिवार, सकाळी नऊ ते सायंकाळी साडेसात या वेळेत संपर्क साधता येईल, असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनमार्फत करण्यात आले.
………