महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण; नोकरी शोधणारे कामगार आणि मनुष्यबळ शोधणारे उद्योजक यांच्यातील दुवा

मुंबई : राज्यातील नागरिकांना रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी साह्यभूत ठरेल, अशा महाजॉब्ज पोर्टलचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज (सहा जुलै) मुंबईत झाले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह दिलीप वळसे-पाटील, नवाब मलिक आणि अदिती तटकरे आदी या वेळी उपस्थित होते. हे पोर्टल नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा ठरणार असून, http://mahajobs.maharashtra.gov.in अशी या पोर्टलची लिंक आहे.

‘महाजॉब्ज हे पोर्टल म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातील मानाचा तुरा असून, काळाची गरज ओळखून सुरू करण्यात आलेल्या या पोर्टलच्या माध्यमातून भूमिपुत्रांना पारदर्शकपणे रोजगार उपलब्ध करून दिला जावा,’ अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, ‘मोबाइलवर महाजॉब्ज नावाचे ॲप उपलब्ध करावे,’ अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

महाजॉब्ज पोर्टलवर दिलेली माहिती अशी –
महाजॉब्ज हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणाऱ्यांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्ज उद्योजकांना कुशल कामगार देऊन त्यांचे काम सुरळीत पार पाडण्यास मदत करते.

कोविड-१९ हे केवळ आरोग्य संकट नव्हे, तर आर्थिक संकट म्हणून जागतिक पातळीवर ओळखले गेले. विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे आर्थिक मंदी निर्माण झाली आहे. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा १५ टक्के वाटा म्हणून देशातील सर्वाधिक उद्योग असणाऱ्या महाराष्ट्राला उद्योगप्रक्रिया सातत्याने सुलभ व उद्योगप्रेमी ठेवण्याची गरज आहे. सध्याच्या संकटाला उत्तर देताना उद्योगाच्या मनुष्यबळाच्या गरजा भागविणे आवश्यक आहे.

कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन उद्योगाच्या दृष्टिकोनातून राज्याचे आर्थिक पुनरुज्जीवन करणे हे ‘महाजॉब्ज’चे लक्ष्य आहे.

महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना विविध कौशल्यांच्या सहाय्याने रोजगार शोधता यावा आणि आणि कामगारांची कमतरता या समस्येवर मात करुन उद्योगांना आपले कार्य सुरळितपणे पार पाडता यावे या उद्देशाने महाजॉब्ज पोर्टल तयार केले गेले आहे. नोकरी शोधणाऱ्या कामगारांना आणि उद्योजकांना सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न आहे.

या पोर्टलची उद्दिष्टे :
– नोकरी शोधणारे कामगार आणि उद्योजक यांच्यामधील दुवा.
– निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मनुष्यबळाची मागणी व पुरवठा यांच्यातील दरी कमी करणे.
– उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास सक्षम करणे.
– महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी कुशल मनुष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण करणे.
…..

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply