रत्नागिरीच्या सुपुत्राने विकसित केले स्वदेशी वस्तू ओळखण्याचे अॅप

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या सुपुत्राने स्वदेशी वस्तू ओळखणारे अॅप विकसित केले आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर या अॅपला विशेष महत्त्व आहे.

करोनाच्या संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. विविध वस्तूंसाठी परदेशातील आयातीवर असणारे अवलंबित्व कमी करणे हा आत्मनिर्भर भारत योजनेचा अर्थ आहे. आपण अनेक बाबतीत आत्मनिर्भर झालो, तर आयातीवर होणारा लाखो कोटी रुपयांचे परदेशी चलन वाचू शकेल. भारताला आयात करण्याची किमान गरज भासावी, यासाठी आपल्याच देशात साधने आणि संसाधनांची निर्मिती करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपल्या नेहमीच्या वापरातील कोणत्या गोष्टी भारतीय बनावटीच्या आहेत आणि कोणत्या परदेशांतून आयात केलेल्या आहेत, हेही समजणे आवश्यक आहे. यासाठीच, मूळच्या गुहागर (जि. रत्नागिरी) येथील असलेल्या आणि सध्या कल्याण (जि. ठाणे) येथे वास्तव्य असलेल्या सौ. प्रिया आणि रोहित गजानन कदम या दांपत्याने Lvocal हे मोबाइल अॅप विकसित केले आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाच्या घोषणेनंतर त्यांना या अॅपविषयीची कल्पना सुचली आणि त्यांनी त्यावर दीड महिना मेहनत घेऊन ते विकसित केले.

भारतात कोणत्या गोष्टी बनवल्या जातात आणि कोणत्या गोष्टी चीन किंवा इतर देशात तयार होतात, याची माहिती या अॅपवरून मिळविता येईल. ज्यात प्रत्येक वस्तूची माहिती मिळते. त्यामध्ये Search चा पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे वस्तूचे उत्पादन भारतात तयार केलेले आहे की नाही, याची माहिती मिळू शकते. बहुतेक वेळा लोकांना फक्त भारतात बनणाऱ्या वस्तू विकत घ्यावयाच्या असतात, पण वस्तूंवर त्याची माहिती कोठेही नसते. भारतीय वाटणाऱ्या अनेक वस्तू भारतात तयार होत नाहीत. अशा वेळी त्या वस्तूंची माहिती या अॅपवर मिळू शकेल.

गुगल प्लेवर https://play.google.com/store/apps/details?id=com.lvocal.main येथे जाऊन हे अॅप डाउनलोड करता येऊ शकेल. अधिक माहितीसाठी रोहित गजानन कदम (९८१९५९२५०२) यांच्याशी संपर्क साधावा.
……


Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply