जिल्ह्यात ८१४ करोनाबाधित; प्रादुर्भाव रोखण्यात रत्नागिरीची कामगिरी उत्तम असल्याचे गृहराज्यमंत्र्यांचे सर्टिफिकेट

रत्नागिरी : जिल्ह्यात काल (सात जुलै) सायंकाळपासून ३३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८१४वर पोहोचली असून, अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६४ आहे. दरम्यान, आज (आठ जुलै) रत्नागिरी दौऱ्यावर असलेले गृह-राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी, रत्नागिरी जिल्ह्याची करोना प्रादुर्भाव रोखण्याची कामगिरी उत्तम असल्याचे सर्टिफिकेट दिले आहे.

गृह-राज्यमंत्र्यांनी उत्तम कामगिरीचे प्रशस्तिपत्र दिले असले, तरी एक जुलैपासून लागू केलेला कडक लॉकडाउन १५ जुलैपर्यंत वाढवण्याचा आदेश आज (आठ जुलै) संध्याकाळी लागू करण्यात आला. ३० जून रोजी करोनाबाधितांची संख्या ५९९ होती. कडक लॉकडाउन केल्यानंतरच्या आठ दिवसांत त्यात २१५ची भर पडली आहे.

रत्नागिरीतील बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता ५२२ झाली आहे. आज कोव्हिड केअर सेंटर देवधे, लांजा येथून एक, जिल्हा कोव्हिड रुग्णालय येथून दोन, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही दापोली येथून चार, कोव्हिड केअर सेंटर पेढांबे येथून पाच आणि कोव्हिड केअर सेंटर घरडा येथील तीन अशा १५ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.

नव्या ३२ रुग्णांना दाखल करण्याचा तपशील असा – जिल्हा कोव्हिड रुग्णालय – ०८, लांजा – ०४, राजापूर-०५, मंडणगड-०४, दापोली-०५, कळंबणी-०५, संगमेश्वर-०१. आज रात्री (आठ जुलै) आणखी एक रुग्ण आढळून आला आहे.

सध्या जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६३ आहे. भाट्ये रोड, राजिवडा, नर्सिंग हॉस्टेल, शंखेश्वर गार्डन, गीता भुवन, मौजे नरशिंगे, मौजे साईनगर कुवारबाव व गद्रे कंपनी, सन्मित्र नगर ही सात क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत् म्हणून घोषित करण्यात आले आहे

आज रात्रीपर्यंतची स्थिती अशी – एकूण पॉझिटिव्ह – ८१४, बरे झालेले – ५२२, मृत्यू – २८, ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह – २६४
त्यापैकी आठ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असून, तीन रुग्ण इतर जिल्ह्यांत उपचारासाठी गेले.

ॲक्टिव्ह कन्टेनमेन्ट झोन
जिल्ह्यात सध्या ७४ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात २४ गावांमध्ये, दापोलीमध्ये आठ गावांमध्ये, खेडमध्ये ९ गावांमध्ये, लांजा तालुक्यात सहा, चिपळूण तालुक्यात २० गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात १ आणि राजापूर तालुक्यात ६ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरणाची रुग्णालयनिहाय स्थिती पुढीलप्रमाणे – शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ४५, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ८, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – १, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल – ७, ग्रामीण रुग्णालय गुहागर – २, केकेव्ही, दापोली – ४ असे एकूण ६८ संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या १६ हजार ७७५ इतकी आहे. अजून ३१३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

रत्नागिरीची कामगिरी उत्तम
‘करोनाबाधितांची आताची संख्या, तसेच बरे झालेले रुग्ण या सगळ्यांचा विचार करता जिल्हा प्रशासनाने करोना प्रादुर्भावावर नियंत्रण राखण्यात यश मिळविले आहे,’ असे प्रतिपादन गृह (ग्रामीण), वित्त्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज शिवाजीराव देसाई यांनी केले.

जिल्हाधिकारी सभागृह येथे कोव्हिड १९ प्रादुर्भाव व त्याअनुंषगाने केलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत ते आज (आठ जुलै) बोलत होते. या वेळी आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, प्र-जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. माने, प्र-जिल्हा शल्य चिकित्सक संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदी संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार राजन साळवी यांनी या वेळी एका कंपनीत विनापरवानगी आलेल्या ४७ कामगारांचा मुद्दा मांडला असता, या सर्वांना त्यांच्या राज्यात परत पाठवण्यात यावे, अशा सूचना देसाई यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.

शंभुराज देसाई म्हणाले, ‘जिल्ह्यातील करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन चांगले काम करत आहे. बाहेरून आलेल्या व होम क्वारंटाइन झालेल्या नागरिकांवर जास्त नजर ठेवा. संस्थात्मक क्वारंटाइन केलेल्यांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्धतेबाबत खबरदारी घ्या. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे, अशा ठिकाणी जास्त डॉक्टरांची नेमणूक करा.’

जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालयांबाबत, रुग्णालयातील औषधांची उपलब्धता, इमर्जन्सीसाठी बेड, ऑक्सिजनचा पुरवठा आदींबाबतचा आढावा त्यांनी घेतला.
…..

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply