लॉकडाउनच्या काळात कोकणचा निसर्ग कुंचल्यातून उतरला कागदावर

पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते. लवकरच कोकणचा हा निसर्ग कला प्रदर्शनाच्या माध्यमातून जहांगीर आर्ट गॅलरीत अवतरणार असल्याचे विष्णू परीट यांनी सांगितले.

लॉकडाउनच्या काळात दररोज जलरंगातील एक चित्र रेखाटण्याचा संकल्प कला शिक्षक विष्णू परीट यांनी केला. हा संकल्प त्यांनी शेकडो चित्रांच्या माध्यमातून पूर्णत्वास नेला आहे. जलरंगात उत्तम काम करणारे चित्रकार म्हणून विष्णू परीट यांची ओळख आहे. आजवर त्यांना विविध पुरस्कार मिळाले असून, त्यांच्या चित्रांची ठिकठिकाणी प्रदर्शनेदेखील भरली आहेत. जलरंगांत चित्र साकारण्यावर त्यांचे प्रभुत्व आहे. खरे तर जलरंगात काम करणे तितकेसे सोपे नाही; मात्र सततच्या सरावाने परीट यांनी जलरंगांतील शैलीवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे.

लॉकडाउनच्या काळात कोकणातील निसर्ग बहरण्याचा काळ समोर आल्याने परीट यांना स्वस्थ बसता आले नाही. निसर्गचित्रकार म्हणून ख्याती पावलेल्या परीट यांनी दररोज एक निसर्गचित्र रेखाटण्याचा संकल्प केला. गेल्या तीन महिन्यात त्यांनी शेकडो निसर्गचित्रे साकारली आहेत. ओघवत्या शैलीत, प्रवाहीपणे रंगलेपन करण्यात परीट यांचा हातखंडा आहे. एका हिरव्या रंगातून अनेक छटा तयार करणे यात त्यांचे खास कसब आहे. कोकणचा निसर्ग त्यांच्या कुंचल्यातून अधिक जिवंत होतो, अशी प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रकाश राजेशिर्के यांनी व्यक्त केली आहे.

विष्णू गोविंद परीट हे संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर, सोनवडे येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. ३५ वर्षांच्या सेवेनंतर ते ३१ जुलै २०२० रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आता खडू हातातून खाली ठेवणार असलो, तरी त्याची जागा कुंचला घेणार आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन ठरले असून, कलारसिकांना कोकणचा निसर्ग लवकरच पाहायला मिळेल असा विश्वास विष्णू परीट यांनी व्यक्त केला आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर कोकण कला विकास संस्थेच्या माध्यमातून कला क्षेत्रातील गरीब आणि होतकरू मुलांना मदत करण्यावर अधिक भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संपर्क : विष्णू परीट – 9422999336

  • जे. डी. पराडकर
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply