रत्नागिरी : करोनाच्या साथीमुळे सार्वजनिक कार्यक्रम होत नसले, तरी त्यासाठी केलेल्या तयारीला आणि उत्साहाला विधायक पर्याय शोधण्याचे प्रयत्न अधूनमधून होताना दिसतात. राजापूरचे आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही भपकेबाज कार्यक्रम न करता चौदा लाख एकतीस हजार रुपयांची रक्कम जमवून कोविड-१९चा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री निधीला देऊन असेच उदाहरण घालून दिले आहे.
सध्या देशावर उद्भवलेल्या करोनाच्या संकटाचा सामना सर्वांनाच करावा लागत असून, महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-१९ या आजारामुळे अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. राज्यावर उद्भवलेल्या या महासंकटाचा सामना करण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला देणगी स्वरूपात मदत करण्याचे आवाहन केले आहे.
शासनाच्या बरोबरीने या कोविड-१९च्या युद्धामध्ये सहभागी होऊन ग्रामपंचायत निधीमधून मुख्यमंत्री सहायता निधीला यथोचित आर्थिक मदत करावी, असे आवाहन यापूर्वीही आमदार डॉ. राजन साळवी यांनी ग्रामपंचायत दौऱ्यावेळी सर्व ग्रामपंचायतींना केले होते. त्याप्रमाणे काही ठरावीक ग्रामपंचायतींनी यथोचित आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीला पाठवली होती.
या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राजापूर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींनी सुमारे आठ लाख ५० हजार रुपये, लांजा तालुक्यातील ग्रामपंचायतींनी चार लाख २३ हजार रुपये आणि साखरपा विभागातील सर्व ग्रामपंचायतींनी एक लाख ५८ हजार २२२ रुपये एवढा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कोविड-१९च्या खात्यासाठी दिला आहे. त्यानंतर जमा झालेले धनादेश आमदार डॉ. राजन साळवी ह्यांच्या उपस्थितीत राजापूर तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
या वेळी रत्नागिरी जि. प. अध्यक्ष रोहन बने, विधानसभा क्षेत्रप्रमुख जयसिंग माने, उप-जिल्हा महिला संघटक दूर्वा तावडे, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, संदीप दळवी, तालुका महिला आघाडी योगिता साळवी, जि. प. महिला बालकल्याण सभापती रजनी चिंगळे, शहरप्रमुख संजय पवार, गुरुप्रसाद देसाई, पं. स. सभापती विशाखा लाड, लीला घडशी, सुजित महाडिक, लांजा नगराध्यक्ष मनोहर बाईत आदी पदाधिकारी, सरपंच व ग्रामसेवक, शाखाप्रमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड