मुलांना निसर्गाची गोडी लावण्यासाठी ऑनलाइन ‘निसर्गरंग’ पाक्षिक सुरू

निसर्गातील घटकांची आवड मुलांना अगदी लहानपणापासूनच असते; मात्र ती आवड जोपासली जाण्यासाठी अनुकूल वातावरण किंवा साहित्य प्रत्येकाला सहजपणे उपलब्ध होतेच असे नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन खास मुलांसाठी निसर्गरंग या ऑनलाइन मराठी पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली आहे. मुलांमध्ये निसर्गसंवर्धनाचे बीज रुजविण्याच्या हेतूने पुण्यातील तेर पॉलिसी सेंटर या आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या संस्थेच्या पुढाकाराने आणि पॅरामाउंट डिजिकॉम या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पूर्व-प्राथमिक ते माध्यमिक (साधारण चौथी ते आठवी) शालेय वयोगटातील विद्यार्थ्यांना डोळ्यांसमोर ठेवून हे पाक्षिक सुरू करण्यात आले आहे. तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे या पाक्षिकाच्या संपादक असून, त्यांना पर्यावरण या विषयात ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत काम करण्याचा अनुभव आहे. १६ जुलै २०२० रोजी या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला असून, नुकत्याच झालेल्या व्याघ्रदिनाचे औचित्य साधून एक ऑगस्ट रोजी व्याघ्र दिन विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

सध्या पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढली आहे, त्या विषयांवर सर्वत्र चर्चा होत आहेत; मात्र पर्यावरण संरक्षण करायचे म्हणजे नेमके काय करायचे, असे विचारले तर अनेकांना त्याबद्दल काही सांगता येत नाही. म्हणूनच लहानपणापासूनच मुलांमध्ये या विषयाची जागरूकता निर्माण करण्यासाठी निसर्गरंग या पाक्षिकाची सुरुवात करण्यात आली आहे. जंगल, प्राणी, पक्षी, किडे, मुंग्या, पाऊस, पाणी, नद्या, समुद्र, खगोल विश्व अशा निसर्गाच्या विविध घटकांशी संबंधित अनेक गोष्टींची शास्त्रीय माहिती मुलांना या पाक्षिकातून मराठी भाषेमध्ये आणि रंजक पद्धतीने वाचायला मिळणार आहे. या अंकातील माहितीला चित्रे, ग्राफिक्स, आकर्षक फोटोग्राफ्स आदींची जोड असेल.

निसर्ग अभ्यासक अनीश परदेशी, खगोल अभ्यासक परिमल दवे, पक्षी अभ्यासक धर्मराज पाटील, वनस्पतितज्ज्ञ डॉ. मंदार दातार, पर्यावरण अभ्यासक पल्लवी कुलकर्णी, वन्यजीव छायाचित्रकार देवेंद्र गोगटे, तसेच पत्रकार अनिकेत कोनकर आदी लेखक या पाक्षिकात विविध विषयांवर लेखन करणार आहेत.

भारतीय विद्यार्थ्यांसाठी या पाक्षिकाचे एका वर्षाचे शुल्क केवळ २०० रुपये असून, शाळेने विद्यार्थ्यांचे शुल्क एकदम भरल्यास सवलत योजनाही आहे. भारताबाहेरील वाचकांसाठी वार्षिक शुल्क पाच डॉलर आहे. सभासदत्व घेतलेल्या मुलांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळणार असून, त्यांना लॅपटॉप, मोबाइल, टॅब अशा कोणत्याही गॅजेटवर सुलभपणे वाचता येण्याच्या दृष्टीने अंकाची रचना आहे. शुल्क ऑनलाइन भरण्याची सोय आहे. दर महिन्याच्या एक आणि १६ तारखेला हा अंक प्रकाशित होणार आहे. निसर्गरंगच्या वेबसाइटवर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खास विभागही तयार करण्यात आला आहे.

अधिक माहितीसाठी आणि सभासदत्व घेण्यासाठी https://nisargaranga.com/ या वेबसाइटला भेट द्यावी. जास्तीत जास्त शाळांनी, पालकांनी आपल्या मुलांना या उपक्रमाचा लाभ करून देण्यासाठी सभासदत्व घ्यावे, असे आवाहन निसर्गरंगच्या टीमकडून करण्यात आले आहे. संपर्क : ९४२०७८१९३८

तेर पॉलिसी सेंटरविषयी :
तेर पॉलिसी सेंटर ही संस्था पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. जलसंवर्धन, वृक्षाच्छादन वाढविण्याच्या उद्देशाने संस्थेतर्फे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. नामांकित कंपन्या आणि स्थानिक संस्थांच्या सहभागातून ही संस्था गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागात विहिरींच्या पुनरुज्जीवनाचे काम करत आहे. संस्थेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व केले असून, कास पठाराला युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळाचा मान मिळवून देण्यातही तेर पॉलिसी सेंटरचा सहभाग होता. मुलांमध्ये पर्यावरणविषयक जागृती करण्यासाठी संस्थेतर्फे अनेक उपक्रम राबविले जातात. निसर्गरंग या नव्या उपक्रमाच्या माध्यमातून निसर्ग आणि पर्यावरणाचे विषय सहज-सोप्या मराठी भाषेतून मुलांपर्यंत पोहोचविले जाणार आहेत.
…..

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply