रत्नागिरी : करोना आणि त्यामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाउन यांमुळे सगळ्याच गोष्टींवर विपरीत परिणाम झाले आहेत. प्रचंड ऊर्जा ज्यांच्यात सळसळत असते, अशी लहान मुलेही या लॉकडाउनमुळे घरातच कोंडली गेली आहेत. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरीत नुकत्याच झालेल्या ऑनलाइन बाल-नाट्य कार्यशाळेमुळे त्यांच्या ऊर्जेला व्यक्त होण्यासाठी चांगले माध्यम उपलब्ध झाले. बालरंगभूमी परिषदेची रत्नागिरी शाखा आणि रत्नागिरी लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
गेली ५० वर्षे व्यक्तिमत्त्व विकासासाठी नाट्यप्रशिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविणारे ज्येष्ठ कलावंत प्रकाश पारखी यांचे मार्गदर्शन या ऑनलाइन कार्यशाळेत मुलांना लाभले. सात ते १५ या वयोगटातील १५ मुले-मुली या उपक्रमात सहभागी झाली होती. जुलै महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी सायंकाळी दोन तास ही कार्यशाळा झाली. याशिवाय, पुण्यातील ज्येष्ठ नाट्यकर्मी देवदत्त पाठक आणि अहमदनगरचे ज्येष्ठ नाट्यकर्मी देविदास सोहनी यांनी दोन मंगळवारी कार्यशाळा घेतली.
केवळ स्क्रीनसमोर बसून भाषण ऐकणे, असे या कार्यक्रमाचे स्वरूप नव्हते, तर ती खऱ्या अर्थाने कार्यशाळा होती, असे बालरंगभूमी परिषदेच्या रत्नागिरी शाखेच्या अध्यक्षा आसावरी शेट्ये यांनी सांगितले. कार्यशाळेतील मार्गदर्शक अनुभवी असल्यामुळे मुलांना नेमके काय आवडेल, याची नस त्यांना अचूक माहिती होती. त्यामुळेच त्यांनी मुलांकडून अनेक गोष्टी करून घेतल्या. या प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतल्याने मुले कार्यशाळेत इतकी रमत होती, की प्रत्येक दिवशी कार्यशाळेची संपल्यानंतरही मुलांकडून वेळ वाढवण्याची मागणी केली जात होती. यावरूनच कार्यशाळेचा उद्देश साध्य झाला असे आम्हाला वाटते, असे शेट्ये यांनी सांगितले.
देवदत्त पाठक यांच्या ‘माझ्याशी पंगा’ या बाल-नाट्याचे ऑनलाइन प्रयोग सध्या सुरू आहेत. या नाटकात काम करत असलेली लहान मुले आपापल्या घरी राहून या नाटकात सहभागी होतात. त्यांनी त्यांच्यापुरता सेट त्यांच्या घरी उभारला असून, योग्य वेळी प्रत्येक जण आपापल्या घरूनच नाटकात एंट्री घेतो आणि नाटक पुढे सरकते. हा प्रयोग पूर्णतः वेगळा आणि नवा आहे. कार्यशाळेत सहभागी झालेल्या रत्नागिरीतील मुलांना या नाटकाचे प्रेक्षक बनण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यांनाही हा नवा प्रयोग प्रत्यक्ष अनुभवता आला, असे शेट्ये यांनी सांगितले. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या एका मुलीची एका जाहिरातीसाठी निवड झाल्याचेही त्यांनी सांगितले.
बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या या उपक्रमाला लायन्स क्लबने सहकार्य केले होते. ‘लायन्स’च्या श्रेया केळकर आणि शेखर कोवळे यांनीही हा उपक्रम आवडल्याचे सांगितले. तसेच, मुलांना प्रत्यक्ष सहभागी करून घेतले गेल्यामुळे त्यांना त्यातून खूप काही शिकायला मिळाले, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. बालरंगभूमी परिषदेच्या अशा सर्जनशील उपक्रमांसाठी ‘लायन्स’चे यापुढेही सहकार्य राहील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
रत्नागिरीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी अनिल दांडेकर यांचाही बालरंगभूमी परिषदेच्या शाखेच्या वतीने या उपक्रमात सक्रिय सहभाग होता. गुगल मीटद्वारे ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी अनिकेत गानू आणि सुनील बेंडखळे यांनी तांत्रिक साह्य केले.