कुडाळ : पडवे (ता. कुडाळ) येथे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सुरू केलेल्या लाइफटाइम हॉस्पिटलमध्ये आमदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमातून मिळालेल्या निधीमधून आरटीपीसीआर (कोविड मोलेक्युलर लॅब) आज (नऊ ऑगस्ट) सुरू झाली. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले.
यावेळी श्री. फडणवीस यांनी सिंधुदुर्गात सुरू होणार असलेले मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलबाबत समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, की अत्याधुनिक प्रकारचे हॉस्पिटल हा महत्त्वाचा टप्पा आहे. कोविडसाठी लॅब असली पाहिजे, हे प्रवीण दरेकर यांनी जाणले. उपयुक्त अशी जागा होती. दादांनी पुढाकार घेतला. भाजपच्या पाच आमदारांनी प्रत्येकी २० लाखाचा निधी दिला. मान्यता मिळण्यासाठीही त्या आमदारांनी मोठा संघर्ष केला. दरेकरांनी उपोषण करण्याची भूमिका घेतली होती; मात्र लॅब मंजूर झाली. ही अत्याधुनिक लॅब असून, दीड तासात ९६ तपासण्या होतील, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. देशातील ३० टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. संक्रमण वाढत आहे. संक्रमणाचे प्रमाण २० टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्रात मृत्युदर चार टक्के आहे. करोनाची ही स्थिती फार गंभीर आहे. अधिकाधिक तपासण्या होणे आवश्यक आहे. दिल्ली सरकारने जास्तीत जास्त तपासणी केली, त्यानंतर मृत्युसंख्या कमी झाली. सुधार होण्याचा दर चांगला आहे, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात टेस्ट वाढवण्याची मागणी आम्ही तीन महिने करत आहोत. आता सरकारने रॅपिड टेस्ट वाढवल्या, उपयोग कमी आहे; पण होत आहे. दोन दिवसांपूर्वी ७६ हजार टेस्ट झाल्या आहेत. टेस्ट वाढविण्याची गरज आहे. सरकारने काळजी घेतली पाहिजे. सिंधुदुर्गात आम्ही ही व्यवस्था उभी केली, त्याच धर्तीवर सरकारने राज्यभर उभी केली पाहिजे. या लॅबमध्ये माकडतापाच्याही टेस्ट होतील. महत्त्वाची जबाबदारी राणेंनी बजावली आहे, असेही ते म्हणाले.
विधान परिषदेतील पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, करोनाने राज्याला बेजार केले आहे. राज्य सरकार अपयशी ठरले आहे. कोकणात आमच्या दबावामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत लॅब झाली. दोन्ही जिल्ह्यातील लोकांना या लॅबचा फायदा होईल.
आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, की या लॅबमुळे रुग्णांना कोल्हापूर व गोव्याला जाण्याची गरज भासणार नाही. राणेंमुळे आता जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
आम्ही पाच आमदारांनी एक कोटी निधी दिला. भाजपचे उद्दिष्ट आणि ध्येय म्हणून करोना योद्धा या नाताने आम्ही हे काम केले, असे आमदार प्रसाद लाड म्हणाले.
नारायण राणे म्हणाले, की कोविड लॅबचे लोकार्पण झाले. मेडिकल कॉलेजचे तीन महिन्यांनंतर उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीसच येतील. त्यांच्यामुळेच ही लॅब झाली. दरेकर यांनी पुढाकार घेतला, त्यांनी सरकारकडे हट्ट धरला. ही अत्याधुनिक लॅब उभी राहणे म्हणजे जनतेला जीवदान दिल्यासारखे आहे. क्रांती दिनी ही लॅब चालू होत आहे. दीड तासात ९६ तपासण्या होतील. लॅबमध्ये कोविडसह ५२ प्रकारच्या तपासण्या होणार आहेत. कॉलेज सुरू झाल्यावर १५० विद्यार्थी तेथे शिक्षण घेतील.
या वेळी आमदार भाई गिरकर, आमदार निरंजन डावखरे, अध्यक्षा नीलमताई राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नीतेश राणे, आमदार रमेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, माजी आमदार अजित गोगटे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, विश्वस्त डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. आर. एस. कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
