आज (१९ ऑगस्ट) जागतिक छायाचित्रण दिन आहे. कॅमेरा हे केवळ माध्यम असून, छायाचित्र हे कॅमेऱ्यामागच्या नजरेत असते. छायाचित्रणतंत्रातील आधुनिकीकरणामुळे आज करोनाकाळातही आपले जगणे सुसह्य झाले आहे. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी घेतलेला या साऱ्याचा हा आढावा…
हजार शब्द बोलण्याची ताकद एक छायाचित्रात असते असं म्हणतात. छायाचित्रण अर्थात फोटोग्राफी हा काही जणांचा व्यवसाय आहे. काही जणांचा छंद आहे. यामुळे याच्या प्रसाराला खूप मर्यादा होत्या; मात्र स्मार्टफोनच्या क्रांतीमुळे याचे सार्वत्रिकीकरण झाले आहे. आज ज्याच्याकडे स्मार्टफोन आहे, त्याला फोटो काढणं शक्य होतंय. असं असलं तरी छायाचित्रण ही तंत्राशी निगडित कला आहे आणि त्याला सर्जनाची जोड मिळणे आवश्यक असते. मुळात कॅमेरा हे एक माध्यम आहे. छायाचित्र हे बघणाऱ्याच्या नजरेत असते.
पारखी नजर असल्याखेरीज उत्तम छायाचित्र काढणं शक्य नाही. मोबाइलमध्ये कॅमेरा हे साधन उपलब्ध झालं. त्यामुळे छायाचित्रण व्यवसायाला पीछेहाट झाली असं वाटलं, तरी खऱ्या छायाचित्रकाराला हा व्यवसाय सदोदित व्यवसायाचं साधन राहणार आहे. त्यामुळे मी सार्वत्रिकीकरण हा शब्द जाणीवपूर्वक वापरला आहे.

कधी काळी कोट्यवधींचा व्यवसाय करणारी कोडॅक कंपनी काळाच्या ओघात नामशेष झाली. कारण बदलत जाणारे छायाचित्रणाचे तंत्र त्यांनी जाणून घेतले नाही; मात्र काळानुसार स्वत:ला अपडेट करणारे छायाचित्रकार आजही उत्तमरीत्या व्यवसाय करीत आहेत आणि विकसित झालेल्या डिजिटल तंत्रज्ञानाने या छायाचित्रण कलेच्या कक्षा रुंदावण्याचं काम केलं. सोबतच अचूकता आणि परिणामकारक छायाचित्रण आज शक्य केल्याचं दिसत आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याने सामान्य जनांच्या अडचणी दूर केल्या आहेत. छोट्या-छोट्या सहलीला जाताना मोबाइल असणं पुरेसं असल्याने त्या सफरीतले क्षण जपणं सहज शक्य झालं आहे. एकट्या व्यक्तीला स्वत:ची प्रतिमा कैद करण्याचं अनोखं तंत्र सेल्फीच्या तंत्रज्ञानानं दिलंय.
मोबाइल व्यवसायाच्या विस्तारासोबत आता त्यातील कॅमेऱ्याची सांगड घातली गेली आहे. एकूणच सर्वांचा दृष्टीकोन बदललेला असल्याचं आपणास दिसतंय. अनेक प्रसंगांत मोबाइलमधील कॅमेरा हा वापरण्यास असणारा सुटसुटीपणा आणि सहजता यामुळे झटकन वापरणं शक्य होतं. याच कारणामुळे आघाडीच्या टीव्ही चॅनल्सनी मोबाइलच्या कॅमेऱ्यातील तंत्राचा फायदा वापरून आपल्या वाहिन्या चालवायला सुरुवात केली आहे.
मोबाइल फोटोग्राफीने वृत्तपत्र जगताचं काम सोपं केलंय. समाजमाध्यमांनी यानुरूप बदल केल्याने त्यांनाही त्याचा फायदा झाला आहे आणि त्यामुळेच आज जगात सर्वाधिक वापरलं जाणारं समाजमाध्यम इन्टा्यग्राम आहे. कॅप्टन कूल धोनीने इन्स्टाग्रामवरच आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. इन्स्टाग्रामवर घोषणा करण्याचे किती कोटी, हे मात्र विचारू नका; पण त्याच्या या निर्णयानं काही बाबी अधोरेखित केल्या हे नक्की.
आता सारं जग करोनामुळे लॉकडाउन स्थितीतून जात आहे. त्या सर्वांचं जगणं आणि घरात बसणं सुसह्य केलं ते याच कॅमेरा क्रांतीने. यातूनच झूम, मीटपासून अगदी एफबी लाइव्ह, इतकंच नव्हे तर शादी मीटपर्यंत नव्या व्यवसायांचा उदय झालेला दिसतो.
छायाचित्रण हे स्थिरचित्रावर सुरू झालं. त्याचं नंतर चलचित्रात रूपांतर झालं. दादासाहेब फाळके यांनी याची व्यावसायिक क्षमता ओळखून स्वत: तंत्र शिकून विकसित केलं आणि त्यांच्यामुळेच भारतात हजारो कोटींची चित्रपटसृष्टी उभी राहिली आहे. त्यामुळे छायाचित्रण एका विशिष्ट मर्यादेत बांधताच येणार नाही.
करोनामुळे शाळा सुरू झाल्या नसल्या, तरी शिक्षण बंद पडू न देण्याचं काम याच छायाचित्रणानं शक्य केलंय. बैठका आणि सभा यांचं रूपांतर वेबिनारमध्ये झाल्यानं भौतिक अंतरं मिटली आणि जग खऱ्या अर्थानं जवळ आणण्याचं काम छायाचित्रणानं केलंय असं चित्र सध्या दिसत आहे.
आरंभिक काळात अवाढव्य असणाऱ्या कॅमेऱ्याचं रूपांतर सहज हाताळता येणाऱ्या यंत्रात झाल्यानंतर त्याला अधिक जणांनी जवळ केलं आणि डिजिटल क्रांतीने हाय डेफिनिशन (HD) आणि अल्ट्रा-हाय डेफिनिशन (UHD) अशी उत्क्रांत अवस्था बाघितली आहे.
जगातील रंगांची विविधता, निसर्गाचं सौंदर्य आणि त्यातील बारकावे… चेहरे… त्यातील भावना, डोळे आणि त्यांचं सौंदर्य… एक ना अनेक बाबी नव्याने बघायला या फोटोग्राफीनं शिकवलं…
हे सारं लिहिताना प्रसिद्धीच्या वलयात वावरणाऱ्या व्यक्तींचा पाठलाग करणारे फोटोग्राफर्स अर्थात पापाराझ्झी आणि त्यांचा पाठलाग चुकवताना झालेल्या दुर्दैवी घटनेत झालेला प्रिन्सेस डायनाचा मृत्यू डोळ्यांसमोर येतो.
याच तंत्राचा वापर करून होणारी हेरगिरी व त्याचे किस्से जसे आठवतात, तसंच समाजकंटकांनी मुलींच्या छळासाठी ब्लॅकमेल आणि व्हायरल केलेले व्हिडिओ, अनेक प्रसंगांत समाजाच्या हिताच्या दृष्टीने झालेले स्टिंग ऑपरेशन… हे सारं छायाचित्रण दिनी आठवायलाच पाहिजे.
विचारात सकारात्मकता आणि पावित्र्य यांच्या जोडीला असणारी फोटोची नजर… यातून निघालेलं चित्रच… छायाचित्र सर्वश्रेष्ठ असं मी मानतो…
से चीज…. स्माइल प्लीज…. क्लिक!
- प्रशांत दैठणकर (जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी)
संपर्क : ९८२३१ ९९४६६
