करोनाच्या सावटातही जपली ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा

पनवेल : करोनाच्या महामारीने सर्वच सण आणि उत्सवांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आज सुरू झालेला गणेशोत्सवही त्याला अपवाद नाही. पण या संकटातही पनवेल तालुक्यातील मोहो गावाने ६७ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा जोपासली आहे.

‘एक गाव एक गणपती’ची परंपरा तब्बल ६७ वर्षांपासून मोहो गावात सुरू आहे. पूर्वीपासूनच अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाचे वलय असलेल्या मोहो गावाचा वारसा आजही लोकांनी जपला आहे. गावातील लोक एकदिलाने एकत्रित यावेत, मतभेद, पक्षभेद टाळावा या उद्देशाने १९५४ साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यात आला. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या श्री हनुमान मंदिरात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. ‘एक गाव एक गणपती’ उपक्रमाबरोबरच इकोफ्रेंडली गणेशमूर्ती, पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींचे आगमन आणि विसर्जन मिरवणुकीची परंपरा जोपासली जाते.

यावर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन शासनाने केले आहे. त्यामुळे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकमेकांमध्ये पुरेसे अंतर राखून ग्रामस्थ मूर्तीचे दर्शन घेत आहेत. मात्र काकडआरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन आदी कार्यक्रमांना बगल देण्यात येणार आहे. दरवर्षी अनंत चतुर्दशीला बाप्पाचे टाळ, मुदुंगाच्या गजरात विसर्जन करण्यात येते. यंदा करोनाच्या पार्श्‍वभूमीवर फक्त दीड दिवसांनी विसर्जन सोहळा साध्या पद्धतीने पार पाडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

जगभर करोनाचे संकट आल्याने गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, यासाठी शासनाने अनेक नियम तयार केले आहेत. त्यामुळे ‘एक गाव एक गणपती’ची वर्षानुवर्षांची परंपरा कायम राखून सध्याच्या आपत्तीकाळात कायद्याच्या चौकटीत राहूनच मोहो गावात गणेशोत्सव साजरा करणार आहोत; परंतु यंदा विविध धार्मिक, सांस्कृतिक, पारंपरिक कार्यक्रम रद्द करावे लागल्याची खंत गणेशोत्सव पंच कमिटीचे हभप गणेश महाराज, हभप लक्ष्मण महाराज, हभप पुंडलिक महाराज, हभप शंकर म्हात्रे, बाबुराव म्हात्रे, सुरेश कडव, पांडुरंग पाठे, गोमा म्हात्रे, गणेश शेळके, बबन म्हस्कर आदींनी व्यक्त केली.

(माहिती सौजन्य : सूरज म्हात्रे. संपर्क ८६५२०३२८७५. mhatresuraj13@gmail.com)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply