रत्नागिरी शहरातील जुने वृत्तपत्र वितरक व व्यावसायिक भबुतमल शहा यांचे निधन

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जुने वृत्तपत्र वितरक व व्यावसायिक भबुतमल शहा (वय ८२) यांचे आज (१३ सप्टेंबर २०२०) निधन झाले.

चार डिसेंबर १९३७ ही त्यांची जन्मतारीख. शहा हे पूर्वीच्या काळी टाइम्स वृत्तपत्र समूहासह अनेक नामवंत व प्रमुख वृत्तपत्रांचे रत्नागिरीतील मुख्य वितरक होते.‌ रत्नागिरीत १९९० साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दरम्यान शहा यांनी नवकोकण नावाचे दैनिक चालवायला घेतले होते. अनेक वर्षे टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्सचे वितरक असल्यामुळे आपले वृत्तपत्र ‘मटा’च्या पद्धतीचे असावे, अशी त्यांची कल्पना होती. तसा आकार त्यांनी आपल्या दैनिकाला देण्याचा प्रयत्न केला होता.

कोकणातील आणि मराठी चालीरीती, पद्धती, सण-समारंभ याविषयी त्यांना आस्था होती. त्याचे प्रतिबिंब आपल्या वृत्तपत्रात पडावे, यासाठी ते प्रयत्नशील होते. वृत्तपत्राच्या वितरणाचा मोठा अनुभव गाठीशी असल्यामुळे नवकोकण दैनिकाच्या वितरणात आपण यशस्वी होऊ, अशी त्यांची अपेक्षा होती; मात्र कालांतराने नवकोकणची मालकी त्यांनी हस्तांतरित केली. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या मालकीचे दै. भैरव टाइम्स हे वृत्तपत्र काही वर्षे चालविले होते.

जैन समाजातही त्यांना वरचे स्थान होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

ज्येष्ठ उद्योगपती, वृत्तपत्र मालकाला रत्नागिरीकर मुकले

शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि आव्हानात्मक परिस्थितीत दैनिक भैरव टाइम्स सुरू करणारे भबुतमल शहा यांची कारकीर्द मी पाहिली. रत्नागिरी येथील जैन समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्त्व असलेल्या भबुतमल शहा यांच्या निधनाने रत्नागिरीकर एका चांगल्या उद्योगपतीला मुकले आहेत. शहा कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply