
शिक्षक दिनानिमित्ताने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेतर्फे ‘माझी शाळा, माझे शिक्षक’ ही लेखमाला सुरू आहे. या लेखमालेतील दहावा लेख आहे योगेश मुणगेकर यांचा… आचरा हिर्लेवाडी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जि. प. पू. प्रा. शाळेतील श्रुती केशव गोगटे यांच्याबद्दलचा…
………
शाळा म्हटलं की दोस्ती, शाळा म्हटलं की मौजमस्ती,
शाळा म्हटलं की आठवणी, शाळा म्हटलं की आपुलकी,
शाळा म्हटलं की अमूल्य, शाळा म्हटलं की अभिमान,
शाळा म्हटलं की निरोप, शाळा म्हटलं की पुन्हा एकदा गाठीभेटी…
खरोखरच वरील काव्यपंक्ती मनुष्याच्या आयुष्यात असलेले शाळेचे महत्त्व अधोरेखित करतात. कारण प्रत्येक माणसाला बाहेरील जगाशी परिचय करून देण्याचे कार्य करते ती फक्त आणि फक्त शाळाच. आणि त्या शाळेतील प्रत्येक मुलाला लळा लावून योग्य संस्कार करण्याचे महत्त्वाचे काम करतात ते त्या शाळेतील शिक्षक. माझ्याही लहानपणी योग्य वेळेत संस्कार करणारी व्यक्ती म्हणजे आचरा हिर्लेवाडी येथील जि. प. पूर्ण प्राथमिक शाळेतील माझ्या शिक्षिका आदरणीय श्रीमती श्रुती केशव गोगटे मॅडम (पूर्वाश्रमीच्या ललिता जोशी) होय.

एक आदर्श शिक्षक कसा असावा याचे मूर्तिमंत स्वरूप म्हणजे श्रीमती गोगटे मॅडम. त्यांचे व्यक्तिमत्त्वही उठावदार होते. उंच, तेजस्वी, प्रसन्न चेहरा, जिद्दी, मेहनती आणि विशेष म्हणजे उत्कृष्ट शिक्षिका. गोगटे मॅडम यांनी ३७ वर्षे विद्यादानाचे कार्य केले. त्यातील १३ वर्षे आमच्या हिर्लेवाडी प्रशालेत शिक्षकी पेशाची सेवा केली.

गोगटे मॅडम यांची शिकवण्याची शैली वेगळीच होती. मॅडम पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रात्यक्षिक घेण्यावर भर देत. त्यामुळे त्या शिकवत असलेला घटक एखाद्या कथेप्रमाणे लक्षात राहत असे. याचा उपयोग मला माझ्या करिअरसाठी मोठ्या प्रमाणात झाला. जेव्हा जेव्हा साने गुरुजी कथामाला, ‘कोमसाप’च्या कार्यक्रमादरम्यान गोगटे मॅडमची भेट होते, तेव्हासुद्धा त्यांचे मार्गदर्शन लाभते. आपण आपल्यासमोर असलेले काम प्रामाणिकपणे आणि वेळेत करावे, हा त्यांचा गुरुमंत्र मी आजही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो.
अशा या गोगटे मॅडम नुकत्याच, ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाल्या. मला मातेसमान असणाऱ्या गोगटे मॅडम यांचे भावी आयुष्य आरोग्यदायी जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
- योगेश रवींद्र मुणगेकर
(सहायक प्राध्यापक, आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा)
पत्ता : मु. पो. आचरा हिर्लेवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग – ४१६६१४
मोबाइल : ८४११० २८२४६
ई-मेल : yogeshmungekar286@gmail. com
…..
(पुढचा लेख वैजयंती करंदीकर यांचा)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

