वेरवली बुद्रुक गावात कुत्र्याला बिबट्याने पळवले

लांजा : तालुक्यातील वेरवली बुद्रुक गावात काल (१५ सप्टेंबर २०२०) रात्री सरदेसाई यांच्या घराच्या आवारात शिरून बिबट्याने कुत्र्याला पळवून नेले. बिबट्यानेच कुत्र्याला पळवून नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झाले. गेल्याच महिन्यात वेरवली बुद्रुक गावात एक बिबट्या मरून पडला होता. काल पुन्हा दुसऱ्या बिबट्याने कुत्र्याला पळवून नेल्याने गावात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे सिद्ध झाले असून भीतीचे वातावरण आहे.

गावातील श्रीकृष्ण सरदेसाई आणि कुटुंबीयांच्या घराच्या आवारात हा प्रकार घडला. काल रात्री साडेदहा वाजता त्यांनी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. पण नंतर काहीच आवाज आला नसल्याने ते झोपी गेले. एकत्र कुटुंब असलेल्या सरदेसाई यांच्यापैकी राजेश यांनी काल रात्रीच कुत्र्याला खाणे घातले होते. आज सकाळी मात्र कुत्रा कोठेच आढळला नाही. श्री. सरदेसाई आणि मुलगा अमित एलआयसीचे प्रतिनिधी आहेत. ते दिवसभर फिरतीवर असतात. घराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी घराच्या परिसरात सीसीटीव्ही बसविले आहेत. त्याचे फुटेज पाहिले, तेव्हा कुत्र्याला बिबट्याने पळविल्याचे स्पष्ट दिसले. सरदेसाई यांनी याबाबत पोलीस पाटील प्रभाकर कुळ्ये यांना कळविले आहे.

वेरवली बुद्रुक गावातच गेल्या महिन्यात मृतावस्थेतील बिबट्या आढळला होता. त्याला जमिनीत पुरून त्याची नखे लपवून ठेवणाऱ्या तिघांना वन खात्याने ताब्यात घेतले होते. वेरवली बुद्रुकच्या पवारवाडीतील जयश्री साळसकर यांच्या जागेत त्या बिबट्या पुरल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. लांजा वनपाल सागर पाताडे, वनरक्षक विक्रम कुंभार, सागर गोसावी, संजय रणधीर यांच्या मदतीने त्या प्रकरणात तिघांना अटक केली होती.

त्याच गावात काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला पळवून नेले. त्यामुळे गावात अजूनही बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली असून वन विभागाने लोकांच्या आणि त्यांच्या पाळीव जनावरांचे संरक्षण होण्यासाठी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दरम्यान, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियांका लगड यांनी काल रात्रीच्या घटनेची नोंद घेतली असून तातडीने कर्मचाऱ्यांना सूचना केल्या आहेत. बिबट्याला पकडण्याकरिता पिंजरा लावण्यासाठी वन खात्याच्या नागपूर येथील कार्यालयाची परवानगी असावी लागते. ती मिळण्यासाठी कार्यवाही सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांना दक्ष आणि सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.


Leave a Reply