जगभरातील मराठी बांधवांचे जानेवारीत ऑनलाइन संमेलन

विश्व मराठी परिषदेचे पहिले विश्व मराठी संमेलन ऑनलाइन पद्धतीने बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका यांच्या सहयोगाने आणि २५ देशांतील महाराष्ट्र मंडळांच्या सहकार्याने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. त्या संमेलनाविषयी…
………
१२ कोटी मराठी भाषकांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने जोडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आणि सक्षम, समर्थ आणि समृद्ध अशा वैश्विक मराठी भाषक समाजाचे स्वप्न बघणाऱ्या विश्व मराठी परिषदेने २८, २९, ३० आणि ३१ जानेवारी २०२१ या चार दिवसांच्या कालावधीत ऑनलाइन विश्व मराठी संमेलन आयोजित केले आहे. यात एक दिवसाच्या स्वतंत्र विश्व मराठी युवक संमेलनाचाही समावेश आहे. संमेलन सर्वांसाठी पूर्णतः निःशुल्क असून, १२ कोटी मराठी भाषकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वैश्विक स्तरावर होणारे हे असे पहिलेच संमेलन ठरेल.

सुमित्राताई महाजन या संमेलनाच्या महास्वागताध्यक्ष असून, उत्तर अमेरिकेतील सर्व महाराष्ट्र मंडळांची प्रातिनिधिक संस्था असलेल्या ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’च्या अध्यक्ष विद्या जोशी संमेलनाच्या महासंरक्षक असतील.

संमेलनामध्ये नऊ जणांचे अध्यक्षीय मंडळ असेल. डॉ. अनिल काकोडकर हे महासंमेलनाध्यक्ष असून – साहित्य विभाग – भारत सासणे, पुणे आणि डॉ. विनता कुलकर्णी, शिकागो – संस्कृती विभाग – सयाजी शिंदे आणि रश्मी गावंडे, फ्रँकफर्ट – उद्योजक विभाग – डॉ. प्रमोद चौधरी आणि मृणाल कुलकर्णी, लंडन, युवा विभाग – उमेश झिरपे आणि अजित रानडे जर्मनी, हे संमेलनाध्यक्ष असतील.

२५ देशांमधून २५ स्वागताध्यक्ष असून, लीना सोहोनी या भारतातील स्वागताध्यक्ष आहेत. संमेलन आयोजक कार्यकारिणी ५१ जणांची असून, त्यात भारताबाहेरील विविध देशांतील २५, महाराष्ट्रातील १५ आणि भारतातील इतर राज्यांतील ११ व्यक्तींचा समावेश आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि शहरे यांतून २०१ प्रतिनिधी असून, महाविद्यालये समन्वयक समिती – ११ जण, संस्था समन्वयक समिती – ११ जण, वाचनालये समन्वयक समिती – ११ जण आणि विविध उपक्रम समन्वयक समिती – ११ जण, अशा एकूण २४५ व्यक्ती काम पाहणार आहेत.

संमेलनामध्ये सुमारे ३२ देशांतील, अमेरिकेतून ४० राज्यांतील, भारतातील १२ राज्यांतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी भाषक बांधव, तसेच १५०हून अधिक संस्था, ५००हून अधिक वाचनालये आणि एक हजारहून अधिक महाविद्यालये सहभागी होत आहेत.

संमेलनामध्ये चर्चा, परिसंवाद, कविकट्टा, कथा कट्टा, संस्कृती कट्टा, आयडिया कट्टा – कल्पनांचे सादरीकरण, वडिलधाऱ्यांसाठी मनोगत कट्टा – सांगेन गोष्टी युक्तीच्या चार, वैश्विक प्रतिभा संगम, उपयुक्त माहितीची देवाणघेवाण इत्यादी बहुविध उपक्रम सादर केले जाणार आहेत.

कविकट्टा : मराठी बांधवांच्या सर्जनात्मक निर्मितीला जागतिक व्यासपीठ मिळावे, वैश्विक संधी उपलब्ध व्हाव्यात, हा कविकट्टा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कथाकट्टा : मराठी बांधवांच्या सर्जनात्मक निर्मितीला जागतिक व्यासपीठ मिळावे, वैश्विक संधी उपलब्ध व्हाव्यात, हा ‘कथाकट्टा’ या उपक्रमाचा उद्देश आहे.

आयडिया कट्टा : विविध प्रकारच्या क्रांतिकारी, उद्योजकीय, आसपासची परिस्थिती बदलू शकणाऱ्या कल्पनांना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने विश्व मराठी परिषदेने ‘आयडिया कट्टा’ हा अभिनव उपक्रम आयोजित केला आहे. त्याचबरोबर मागील काही वर्षांमध्ये ज्यांनी स्टार्टअप सुरू केले आहे, त्याविषयीची माहिती या उपक्रमाद्वारे शेअर केली जाणार आहे.

संस्कृती कट्टा : संस्कृतीची पाळेमुळे खेड्यापाड्यांमध्ये वसलेली आहेत. केवळ शहरी भागांमध्ये सादर होणारे तथाकथित सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे संस्कृती नाही. जागतिकीकरणाच्या रेट्यातसुद्धा आपले अस्तित्व राखून असलेली ग्रामीण संस्कृती आणि तिच्या विविध आयामांना जगासमोर आणणे असा या उपक्रमाचा उद्देश आहे.

सांगेन गोष्टी युक्तीच्या चार (मनोगत कट्टा) : वडीलधाऱ्यांचे अनुभव, मनोगत, उपदेश तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तरुण पिढीपर्यंत पोहोचावेत, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

वैश्विक प्रतिभा संगम : माहितीचे आदान-प्रदान, वैश्विक ओळख आणि निर्मितीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमामध्ये साहित्यिक – लेखक, कवी, अनुवादक, बालसाहित्यकार, प्रकाशक, कलाकार – गायक, संगीतकार, कीर्तनकार, प्रवचनकार, पोवाडा, लावणी, वासुदेव, कडकलक्ष्मी, मर्दानी खेळ, एकपात्री कलाकार, सूत्रसंचालक, निवेदक, पोतराज, एकांकिका सादर करणारे, चित्रकार, भटजी (पौरोहित्य करणारे), दशावतार, खेळाडू, गोंधळी, मंगळागौर, नृत्यांगना, धनगरी नृत्य, दंडार, खाडी गम्मत, तुंबडीवादक, पालखी, जाखडी, नकटा, लेझीमपथक, ढोलपथक, संबळपथक, वनवासी कला आणि नृत्ये, कोळी नृत्ये, इत्यादी, तसेच संस्था – सांस्कृतिक उपक्रम संस्था, एनजीओ, समाजपयोगी संस्था, देवस्थाने, बचत गट, उत्पादक, स्टार्टअप यांची माहिती संमेलनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाणार आहे. या उपक्रमातून जगभरातील मराठी भाषिक त्यांच्याशी थेट जोडले जातील.

आतापर्यंत २५ देशांतील (अमेरिका, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा, युगांडा, झांबिया, नायजेरिया, इत्यादी) महाराष्ट्र मंडळांनी संमेलनासाठी आपला सहयोग दर्शविण्यासंबंधी लेखी पत्रे दिली आहेत. ‘बृहन्महाराष्ट्र मंडळ ऑफ नॉर्थ अमेरिका’ ही अमेरिकेतील ६० राज्यांमधील बृहन्महाराष्ट्र मंडळाची शिखर संस्था, भारताबाहेरील मराठी भाषकांची सर्वांत मोठी संस्था – मराठी विश्व, न्यू जर्सी, अमेरिका, छत्रपती शिवाजी महाराज अमेरिका परिवार, बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली अशा देश-विदेशांतील अनेक संस्था संमेलनाला सक्रिय सहयोग करीत आहेत.

संमेलनासाठी विशेष संकेतस्थळ तयार करण्यात येत असून, त्यावर संमेलनाची विस्तृत माहिती उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. देश-विदेशांतील मराठी बांधवांनी संमेलनासाठी प्रतिनिधी म्हणून नि:शुल्क नोंदणी करण्यासाठी www.sammelan.vmparishad.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन विश्व मराठी परिषदेच्या वतीने करण्यात येत आहे.

देश-विदेशातील मराठी भाषकांनी या संमेलनात सहभाग नोंदवावा असे आवाहन विश्व मराठी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. क्षितिज पाटुकले यांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply