सोशल मीडियावर रंगले पाचवे ‘कानसेन’ संमेलन

रत्नागिरी : सोशल मीडियाद्वारे राज्यभरातील विविध प्रांतांतून एकत्र आलेल्या ‘कानसेनां’नी सलग चार वर्षे रत्नागिरीत प्रत्यक्ष स्नेहसंमेलन साजरे केले; मात्र या वर्षीच्या अभूतपूर्व परिस्थितीत प्रत्यक्ष संमेलन घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे संमेलन आयोजित करण्यात आले आणि ते यशस्वीपणे साजरे झाले. संमेलनाला यंदा व्यापक स्वरूप मिळाले. सलग दहा दिवस वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी मिळाली.

फेसबुकच्या माध्यमातून पार पडलेल्या या संमेलनात पाचशेहून अधिक जणांनी उपस्थिती नोंदवली. दररोज तासभराचा लाइव्ह परफॉर्मन्सही रंगला. ह. भ. प. सायली मुळ्ये हिने कीर्तन सादर केले. प्रतीक जोशी यांची शास्त्रीय गायन, अभंग, नाट्यगीतांची मैफल, प्राजक्ता पेटकर-मोरे, सई हातेकर, मानसी कुलकर्णी व मनोज क्षीरसागर यांचा मराठी गीतांचा कार्यक्रम ‘स्वरगंध’ आणि ‘एका संगीतकाराची मुशाफिरी’ हा सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांचे गीतगायन आणि मार्गदर्शन असलेला कार्यक्रम संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरला. चित्रे, रांगोळी, फोटोग्राफी, मूर्तिकला, ओरिगामी, पॉटरी, मेंदी प्रात्यक्षिक, पाककला, विविध हस्तकला यांच्या ध्वनिचित्रफिती सादर झाल्या. विनया परब यांच्या संगीत संयोजनाखाली ‘स्वराभिषेक- रत्नागिरी’च्या शिष्यवर्गाने बहारदार गीतगायनाची मेजवानी रसिकांना दिली.

ऐश्‍वर्या बेहरे (अभिवाचन), वर्षा जोशी व अर्चना देवधर (काव्य), श्रीरंग दातार (कथा), शिल्पा कुलकर्णी (नाट्यछटा) यांच्या सादरीकरणासोबत ‘कोकणचा साज..’चे कलाकार सुनील बेंडखळे यांनी संगमेश्‍वरी बोलीतून रसिकांशी संवाद साधला. निनाद दैठणकर (संतूरवादन), शेखर दंडे व विलास हर्षे (संवादिनी) आणि सुप्रसिद्ध की-बोर्ड ब्लेअर सत्यजित प्रभू यांचे संवादिनीवादन मंत्रमुग्ध करणारे ठरले.

प्रसिद्ध गझलगायक सुरेश दंडे यांच्यासह दीपमाला लोहाडे व अस्मिता काळे यांचे गायनही रसिकांना भावले. मिताली भिडे (भरतनाट्यम्), दर्शना कामेरकर, रूपाली लिमये, रूपाली फडके, अक्षता क्षीरसागर, मृणाली डांगे, मृणाल केळकर, सायली जाधव, स्वरदा महाबळ यांनी वैविध्यपूर्ण नृत्याविष्कार सादर केला. शास्त्रीय नृत्याने संमेलनाचा समारोप झाला. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन सुनीता गाडगीळ यांनी केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply