रत्नागिरी : डोळे चांगले राहण्यासाठी मुलांनी चांगला आहार घेतला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, तसेच चिंचा, बोरे, आवळे खाल्ले पाहिजेत, अशी सूचना प्रसिद्ध बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी केली.
रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये नुकताच लहान मुलांचे डोळ्यांचे आजार याविषयी मार्गदर्शन कार्यक्रम आणि जागरूक पालक, मुलांचा स्नेहमेळावा झाला. त्या वेळी ते बोलत होते. अनेक पालक येथे मुलांना घेऊन येत आहेत. तिरळे डोळे असल्यास मूल शाळेत जात नाही, अशा मुलामुलींचे विवाह होताना अडचणी येतात. जिल्ह्यातील अशा रुग्णांवर उपचारांसाठी त्यांनी आवर्जून इन्फिगोमध्ये यावे, असे आवाहन त्यांनी केले.

संगमेश्वर पंचायत समिती सदस्य जयाशेठ माने यावेळी म्हणाले की, रत्नागिरीत अद्ययावत व डोळ्यांविषयी सर्वंकष रुग्णालयाची गरज होती. आज इन्फिगो आय केअरच्या माध्यमातून भांबेड (ता. लांजा) येथील सुपुत्र डॉ. श्रीधर ठाकूर यांनी या सर्व सुविधा, आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉक्टर्स रत्नागिरीत उपलब्ध केले. त्यांच्या माध्यमातून संगमेश्वधर तालुक्यात नेत्रतपासणी शिबिरे आयोजित केली जातील.
काही पालकांनी पाल्याच्या डोळ्यांच्या समस्या दूर झाल्याचे सांगून इन्फिगोचे आभार मानले. जमलेल्या मुलांना नेलकटर, उड्यांसाठी दोरी, चेंडू, रंगपेटी असे उपयुक्त साहित्य देऊन गौरविण्यात आले. दीपक इंदुलकर यांनी रुग्णालयातील सेवासुविधांची माहिती दिली. आतापर्यंत येथे मोतीबिंदू, तिरळे डोळे आदींच्या दोन हजारांहून अधिक शस्त्रक्रिया त्यांनी केल्याचे सांगितले.