एकत्रित वैद्यकीय सुविधेसाठी इन्फिगोने पुढाकार घ्यावा : उदय सामंत

रत्नागिरी : इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमुळे डोळ्यांच्या उपचारांसंदर्भातील कोकणातील उणीव दूर झाली आहे. आता यापुढे जाऊन इन्फिगोने पुढाकार घेऊन इतर वैद्यकीय विशेषज्ञांच्या समन्वयातून सर्वसामान्यांसाठी एकत्रितरीत्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली.

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे डोळ्यांचे हॉस्पिटल नेटवर्क असलेल्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये रत्नागिरी तालुक्यातील पत्रकारांसाठी खास नेत्रचिकित्सा व तपासणी शिबिराचे आयोजन २९ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. श्री. सामंत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी श्री. सामंत यांचे स्वागत केले. श्री. सामंत म्हणाले, की आताच्या प्रगत युगात पत्रकार मित्रांचा सातत्याने मोबाइल, लॅपटॉप, संगणक इत्यादी उपकरणांशी संपर्क येतो. त्याचा साहजिकच डोळ्यांवर ताण येतो. त्यासाठी नेत्रचिकित्सा आवश्यक आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी मी डॉ. ठाकूर यांना धन्यवाद देतो.

डॉ. ठाकूर यांनी प्रास्ताविकात गेल्या दोन महिन्यांमध्ये इन्फिगोने केलेल्या कार्याची माहिती दिली. अवघ्या दोन महिन्यांत इन्फिगोने पाच हजारांवर रुग्णांची संपूर्ण नेत्रतपासणी केली. त्यापैकी चार हजार रुग्णांची नेत्रतपासणी संपूर्णपणे मोफत करण्यात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या व अवघड अशा डोळ्याच्या पडद्याच्या २० शस्त्रक्रिया चेन्नईतील शंकर नेत्रालयातून प्रशिक्षित डॉ. प्रसाद कामत यांनी कौशल्याने पार पाडल्या. सातशेहून अधिक रेटिना आणि डोळ्यांच्या पडद्याच्या रुग्णांची तपासणी केली. तीनशेहून अधिक मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. गरीब आणि गरजू तसेच अत्यायिक अवस्थेत आलेल्या काही रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुलांचे डोळ्यांचे डॉक्टर नसल्याने आजपर्यंत डोळ्यांचा तिरळेपणा व आळशी डोळे यावर निदान व शस्त्रक्रिया या सुविधांचा अभाव होता, इन्फिगोमध्ये असलेले बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप देशपांडे यांनी अशा मुलांच्या १० शस्त्रक्रिया अतिशय कौशल्याने पार पाडल्या. इन्फिगोच्या नेत्ररोग शाखेमध्ये या सर्वव्यापक कार्यामुळे कोणत्याही रुग्णाला मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली येथे जाण्याची गरज नाही.

येत्या एक डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या काळात जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व त्यांचे आई-वडील यांची तीन टप्प्यांतील सर्वंकष नेत्रतपासणी मोफत केली जाईल, असे डॉ. ठाकूर यांनी जाहीर केले. सहा महिने सर्व शिक्षक डिजिटल माध्यमातून ऑनलाइन क्लासेस घेत असल्याने त्यांच्या डोळ्यांची तपासणी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची नेत्रतपासणीही इन्फिगोने मोफत करावी, अशी सूचना पत्रकार अलिमियाँ काझी व काही पत्रकारांनी व्यक्त केली. त्यावर एक डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या काळात आधारकार्ड हा वयाचा पुरावा म्हणून दाखवून सर्व ज्येष्ठ नागरिकांची मोफत तपासणी करू, असेही डॉ. ठाकूर यांनी जाहीर केले.

कार्यक्रमास इन्फिगोचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स, मोतिबिंदू तज्ज्ञ डॉ. स्वप्ना गंधे, डॉ. किरण हिरजे, डॉ. नितीन भगत उपस्थित होते. त्यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन पत्रकार आणि इन्फिगोचे दीपक इंदुलकर व त्यांचे सहकारी यांनी यशस्वीपणे पार पाडले. शिबिरात ४० पत्रकारांची नेत्रतपासणी करण्यात आली. त्यांना आवश्यक सल्ला देण्यात आला. कार्यक्रमानंतर मंत्री श्री. सामंत सामंत, नगराध्यक्ष श्री. साळवी यांनी नेत्ररुग्णालयाची पाहणी करून सुविधा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ऑपरेशन थिएटर पाहून समाधान व्यक्त केले. हॉस्पिटलने अल्पावधीत केलेल्या प्रगतीचे त्यांनी कौतुक केले. रत्नागिरी शहराला यामुळे एक नवीन ओळख मिळेल व रुग्णांची बाहेरगावी जाण्याची परवड थांबेल, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाला नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी, बांधकाम आरोग्य सभापती महेश ऊर्फ बाबूशेठ म्हाप, उपजिल्हा प्रमुख संजूशेठ साळवी, शहर अध्यक्ष बिपीन बंदरकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत यांच्यासह पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार हेमंत वणजू यांनी केले, तर आभारप्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केले.

(लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून कशी खबरदारी घ्यावी, याविषयी इन्फिगो हॉस्पिटलमधील बालनेत्ररोगतज्ज्ञ दीपक देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये…)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply