रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे येत्या डिसेंबरमध्ये कोकणातील पुरातन ठेवा असलेली कातळ-खोद-चित्रे पाहण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.
कोकणातील कातळ-खोद-चित्रे हा अनेकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. या अमूल्य पुरातन ठेव्याचे जतन संवर्धन व्हावे, यासाठी या कातळ-खोद-चित्रांचे शोधकर्ते रत्नागिरीतील सुधीर रिसबूड, प्रा. धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांची स्वखर्चाने धडपड चालू आहे. या संदर्भात श्री. ठाकरे यांना माहिती मिळाली आणि त्यांनी लगेचच भेटीचे निमंत्रण दिले. त्यानुसार श्री. रिसबूड, प्रा. मराठे आणि डॉ. ठाकूरदेसाई त्यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले. जवळपास तासभर झालेल्या चर्चेत श्री. ठाकरे याना कातळ-खोद-चित्र रचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. कातळशिल्प संरक्षण, संवर्धनाबाबत शासन-प्रशासन पातळीवर चाललेल्या कामाची माहिती दिली.
व्यक्तिगत पातळीवर आणि निसर्गयात्री संस्थेच्या माध्यमातून ऐतिहासिक, प्रागैतिहासिक तसेच जैवविविधतेचे संरक्षण, संवर्धन, त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत शाश्वत पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेल्या कार्याची माहितीही देण्यात आली. कोकणातील पर्यटन विकासाबाबतही चर्चा झाली. शोध संरक्षण आणि संवर्धनाला आर्थिक बाबींची गरज असतेच. विविध माध्यमातून शोधकर्त्यांना ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले आणि श्री. ठाकरे यांची भेट होण्यासाठी पुढाकार घेणारे इन्फिगो आय केअर सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर, धनंजय पराडकर, रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सदैव धडपडणारे आणि खोद चित्र शोधकर्त्यांच्या पाठीशी उभे असणारे हर्षा हॉलिडेजचे सुहास ठाकूरदेसाई, कौस्तुभ सावंत, वास्तुविशारद मकरंद केसरकर ही मंडळीही यावेळी उपस्थित होती .
विचारांच्या आदानप्रदानात श्री. ठाकरे यांनी काही मौलिक बाबी मांडल्या. कलाप्रेमी श्री. ठाकरे यांनी चाललेल्या कामाचे कौतुक केले. दृक्श्राव्य आणि प्रिंट मीडियामधून कोकणातील कातळशिल्प याबाबत वाचून होतो, पाहिले आहे, त्यातूनच अधिक जाणून घेण्याची इच्छा अगोदरपासून होती, असेही ते म्हणाले. लवकरच त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त करून त्यांनी रत्नागिरीत कातळशिल्पे प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि चाललेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आपल्या सहकाऱ्यांना दिल्या. त्यानुसार येत्या डिसेंबरमध्ये त्यांची भेट अपेक्षित आहे.
(‘पूर्वजांच्या पाषाणखुणांच्या शोधाची गोष्ट : कोकणातील कातळ-खोद-चित्रे’ हा विस्तृत लेख कातळ-खोद-चित्रांच्या शोधकर्त्यांनी साप्ताहिक कोकण मीडियासाठी लिहिला होता. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

