रत्नागिरी जिल्हा रुग्णालयातील अनेक त्रुटींवर मंत्र्यांच्या भेटीने प्रकाश

रत्नागिरी : भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयांच्या सुविधेबाबत चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानुसार आज (रविवारी) रत्नागिरीच्या शासकीय रुग्णालयाला उच्च आणि शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अचानक दिलेल्या भेटीत रुग्णालयातील अनेक त्रुटींवर प्रकाश पडला. विविध विभागांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे आढळून आले.

श्री. सामंत यांनी सर्व अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. येत्या १४ तारखेपर्यंत रुग्णालयातील सर्व त्रुटींची पूर्तता झाली पाहिजे, असे बजावले.

श्री. सामंत यांनी शासकीय रुग्णालयातील नवजात बालकांच्या विभागाला भेट दिली. बाल विभागात व इतर विभागात फायर ऑडिट झाले नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याचे सांगण्यात आले. रुग्णालयाचे ऑपरेशन थिएटरही काही कारणामुळे बंद आहे, हे कळल्यावर याबाबत सामंत यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

श्री. सामंत यांच्या भेटीच्या वेळी नातेवाईकांच्या गर्दीने वॉर्ड भरून गेला होता. बाल विभागासाठी सध्या नेमण्यात आलेल्या खासगी डॉक्टर मंत्री येऊनही उपस्थित नव्हते. सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात आणि विविध भागात रुग्णांची, नातेवाईकांची गर्दी होती. परंतु बऱ्याच जणांनी मास्क घातले नव्हते. श्री. सामंत यांनी याबाबत निवासी वैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली. त्यांचा एकमेकांमध्ये समन्वय नसल्याचे आढळून आले करोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाबतीत तक्रारी येता कामा नयेत, असेही श्री. सामंत यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

येत्या १४ तारखेपर्यंत या सर्व गोष्टीची पूर्तता संबंधित खात्याकडून करून घ्यावी. मी पुन्हा रुग्णालयाला भेट देणार आहे, असे त्यांनी सांगितले. जे बाल रोगतज्ज्ञ आपल्या भेटीच्या वेळी उपस्थित नव्हते, त्यांच्याकडून तातडीने खुलासा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित नसलेल्या सिव्हिल सर्जन डॉ. संघमित्रा फुले आणि जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याशी श्री. सामंत यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.

भंडाऱ्यासारखी घटना दुर्दैवाने रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात घडली, तर तिचा सामना करण्यासाठी रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही, हे श्री. सामंत यांच्या भेटीतून पुढे आले. नवजात शिशु केयर सेंटरमध्ये कमी वजनाची बालके, तसेच प्रकृती नाजूक असलेल्या नवजात बालकांना विशेष निगराणीखाली ठेवले जाते. जिल्हा रुग्णालयातील नवजात अतिदक्षता सेंटरमध्ये १५ नवजात बालकांना ठेवण्याची क्षमता असून तेथे सध्या १० बालकांची काळजी घेतली जात आहे. पूर्वी कार्यरत असलेल्या विभागाच्या दुरुस्तीमुळे हा विभाग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यरत आहे. या विभागात एखाद्यावेळी आगीसारखी अनुचित घटना घडल्यावर परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवता यावे, यासाठी लागणारे सिलिंडर्स उपलब्ध नाहीत. या विभागाकडे जाण्यासाठी एक जिना आहे. आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यानंतर करायच्या उपाययोजनेबाबत रुग्णालय व्यवस्थापनाकडे आराखडा नाही. जिल्हा रुग्णालयातील महिला प्रसूती विभागातही अग्निरोधक सिलिंडरचा तुटवडा आहे. असलेल्या सिलिंडरची मुदत संपण्याच्या मार्गावर असून काही सिलिंडरची मुदत संपली आहे. त्यामुळे रुग्णालयातील अग्निरोधक सिलिंडरच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित झाला आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात असे प्रसंग उद्भवू नयेत, यासाठी प्रशासनामार्फत योग्य खबरदारी घेतली जात आहे. गतवर्षी आगीसारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयात मॉक ड्रिल घेण्यात आले होते. पण अलीकडे करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आवश्यक असलेल्या यंत्रणेबाबत तातडीने आढावा घेतला जाणार आहे. त्यानुसार तातडीने उपाययोजनांसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे.

  • डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply