कोकण रेल्वे, महामार्ग चौपदरीकरणातून उद्योजकता वाढावी – नारायण राणे

रत्नागिरी : कोकण रेल्वे आणि लवकरच चौपदरीकरण पूर्ण होणार असलेला मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग यांचा उपयोग कोकणातील उद्योजकता वाढीला लागण्यासाठी व्हायला हवा, अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज (रविवारी) रत्नागिरीत व्यक्त केली.

दि यश फाउंडेशनच्या नर्सिंग कॉलेजमधील मुलींच्या वसतिगृहाचे श्री. राणे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. रत्नागिरीचे माजी आमदार आणि दि यश फाउंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांचा ५६ वा वाढदिवसही आज साजरा झाला. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, श्री. माने यांच्या नर्सिंग कॉलेजमुळे कोकणातील दोन हजार कुटुंबांना आर्थिक पाठबळ मिळाले, ही अभिमानाची बाब आहे. नर्सिंग कॉलेजसाठी जागा मिळवून देण्यात मी प्रयत्न केले, असे श्री. माने यांनी सांगितले. मात्र तरीही स्थानिक मुलींना नर्सिंगचे प्रशिक्षण दिले जावे, ही संकल्पना बाळ मानेंची आहे. त्यामुळे कॉलेजचे श्रेय पूर्णतः माने यांनाच आहे. नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी चांगला आहार घेऊन सुदृढ व्हावे. सिंधुदुर्गमधील हॉस्पिटलमध्येही या परिचारिकांना नोकरी देऊ. कोकण आरोग्यात मागे नाही. येथे भरपूर स्वच्छता असल्याने भयावह रोगांचा प्रसार होत नाही. रत्नागिरी जिल्हा पुढे जाण्यासाठी स्पर्धा केली पाहिजे. श्री. माने यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्यात नर्सिंग कॉलेजचे काम उजवे असून त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि अनेक उपक्रम त्यांच्याकडून होवोत, असे आशीर्वाद मी देतो, असेही श्री. राणे म्हणाले.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा भाजप अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन म्हणाले की, चौतिसाव्या वर्षी जनमानसाची नाडी त्यांनी ओळखून श्री. माने यांनी भाजप तळागाळात पोहोचवला आहे. राजकारण, क्रीडा, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भरीव काम केले आहे. मतमतांतरे झाली तरी सच्चे मित्र म्हणून आम्ही कायम राहिलो.

बाळ माने म्हणाले, राणे कुटुंबीयांशी आमचे अनेक वर्षे ऋणानुबंध आहेत. नर्सिंग कॉलेजसाठी भूखंड मिळणे ही प्रक्रिया फक्त राणेंच्या पत्रामुळे सहज शक्य झाली. जिल्हा मच्छीमार संघाची घोडदौड त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली. कोकणचे खरे नेते नारायण राणे आहेत. कोकणाला व नर्सिंग क्षेत्राला श्री. राणे यांच्या रूपाने राजाश्रय मिळावा, अशी अपेक्षा श्री. माने यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात रजिस्ट्रार सौ. शलाका लाड यांनी कॉलेजच्या यशस्वी कारकिर्दीचा आढावा घेतला. सूत्रसंचालन सौ. अनघा मगदूम-निकम यांनी केले. बाळ माने यांचा शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार नारायण राणे यांनी केला.

यावेळी श्री. राणे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला व्यासपीठावर दी यश फाउंडेशनच्या सहव्यवस्थापकीय विश्वपस्त सौ. माधवी माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त मिहिर माने, सहव्यवस्थापकीय विश्वस्त विराज माने, बाळ माने यांचे ज्येष्ठ बंधू हेमंत माने, कुसुमताई पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नाना शिंदे, माजी जि. प. उपाध्यक्ष सतीश शेवडे, डॉ. मिलिंद कुलकर्णी, चंद्रकांत खानविलकर, कॉलेजच्या रजिस्ट्रार सौ. शलाका लाड आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रंथपाल सौ. मानसी मुळ्ये यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दी यश फाउंडेशनच्या कॉलेज ऑफ नर्सिंगचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजन केले. त्यांना रजिस्ट्रार सौ. शलाका लाड, प्राचार्य मीनाक्षी देवांगमठ यांचे मार्गदर्शन लाभले. नगरसेवक, विविध तालुक्यांचे भाजपचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक, हितचिंतकांनी श्री. माने यांना शुभेच्छा दिल्या.

करोनामुळे कार्यक्रमाला मर्यादित लोकांना निमंत्रित केले होते. परंतु हजारो कार्यकर्त्यांना हा कार्यक्रम पाहता यावा याकरिता हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह केला होता. त्याला उदंड प्रतिसाद लाभला.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply