रत्नागिरी : मधुमेही व्यक्तींना होणाऱ्या डायबेटिक रेटिनोपॅथीसह विविध नेत्रविकारांची तपासणी रत्नागिरीत ५ आणि ६ मार्चला होणार आहे. इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे ही विशेष तपासणी केली जाणार असून जिल्ह्यातील मधुमेही नेत्ररुग्णांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतात मधुमेही व्यक्तींची संख्या वेगाने वाढत असून काही ठिकाणी लोकसंख्येच्या १३ टक्के व्यक्तींना मधुमेह झाल्याचे लक्षात आले आहे. अनियमित जीवनशैली, ताणतणाव, अनियंत्रित आहार ही त्यामागील काही कारणे आहेत. मधुमेह सर्वव्यापी व्याधी असून त्यामुळे मेंदू, मूत्रपिंड, हृदय, डोळे या प्रमुख अवयवांचे आजार व्हायला आणि त्यांचे कार्य बिघडवायला कारणीभूत ठरतो. त्याचा सर्वाधिक परिणाम डोळ्यांवर होतो. मधुमेहामुळे चष्म्याचा नंबर अचानक वाढतो, भुरकट दिसू लागते. मोतिबिंदूही इतरांपेक्षा तुलनेने कमी वयात होऊ शकतो. बुब्बुळात कोरडेपणा येणे आणि डोळ्यांचे स्नायू कमजोर झाल्याने तिरळेपणा येऊ शकतो. डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे तर सर्वांत गंभीर आणि दृष्टी कायमची अधू किंवा अंध करू शकणारा आजार आहे.
मधुमेहात रक्तातील वाढलेल्या साखरेमुळे रक्तवाहिन्या आतून पातळ होतात आणि त्यांचा आकार वाढतो. पातळ झाल्याने रक्तवाहिन्या कमकुवत होऊन कधी कधी डोळ्यांतील पडद्यापुढे रक्तस्राव होतो किंवा काही वेळी त्या अरुंद झाल्याने रेटिनाला रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. रेटिनाचा तेवढाच भाग निकामी होतो. त्यामुळे धूसर दिसू लागते. रक्तवाहिन्या फुटल्यास अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊन रेटिना जागेवरून सरकणे, डोळ्यांच्या आत रक्तस्राव होणे इत्यादी प्रकार होतात. अशा विकारात उपचार करूनदेखील दृष्टी पूर्ववत होत नाही. त्यामुळे वेळीच रेटिना तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही, तर अंधत्व येऊ शकते.
रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात सुसज्ज आणि आधुनिक असा रेटिना विभाग रत्नागिरीच्या इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये उघडण्यात आला असून गेल्या ५ महिन्यांत तेथे रेटिनाच्या २००० पेक्षा अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. चेन्नईतील शंकर नेत्रालयातून प्रशिक्षित इन्फिगोच्या रेटिना विभागाचे प्रमुख संचालक डॉ. प्रसाद कामत यांनी १०० हून अधिक गुंतागुंतीच्या रेटिना शस्त्रक्रिया प्रथमच रत्नागिरीत केल्या आहेत. रेटिना तज्ज्ञ डॉ. कामत येत्या ५ आणि ६ मार्च रोजी इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये मधुमेही व्यक्तींची रेटिना तपासणी आणि गरज भासल्यास शस्त्रक्रिया करण्यासाठी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे मधुमेही व्यक्तींना रेटिनाच्या उपचारांसाठी मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे जाण्याचा खर्च व वेळ वाचणार असून रत्नागिरीतच सर्व उपचार करण्यात येतील.
ज्यांना अनेक दिवसांपासून मधुमेह आहे, त्यांनी आपले डोळे वेळीच रेटिना तज्ज्ञांकडून तपासून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अशा सर्वांनी ९३७२७६६५०४ या क्रमांकावर नावनोंदणीसाठी संपर्क साधावा आणि रत्नागिरीत उपलब्ध झालेल्या नेत्रतपासणीच्या सोयीचा लाभ उठवावा, असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे करण्यात आले आहे.

